मुंबई: ‘भाजप बंद दाराआड काही करत नाही, जे करते ते खुलेआम, डंका वाजवून करते,’ असं म्हणत शिवसेनेवर तोफ डागणारे केंद्रीय गृहमंत्री यांच्या वक्तव्याची शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे. ‘फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतो, असा सवाल करतानाच, ‘शहा यांच्या त्या वक्तव्यावर कोकणातली भुतेही हसून नाचली असतील,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित शहा यांनी तेथील सभेत बोलताना शिवसेनेला लक्ष्य केले होते. ‘शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द आम्ही कधीच दिला नव्हता. आम्ही बंद दाराआड काही करत नाही,’ असं ते म्हणाले होते. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं आज शहांच्या त्या आरोपांचा समाचार घेतला आहे. ‘भाजपच्या वागण्या-बोलण्यातून वैफल्य स्पष्टपणे दिसत आहे. महाराष्ट्रातून सत्ता उलथवून टाकल्याचा बाण काळजात घुसला आहे. ज्या वैद्यकीय कॉलेजचे उद्घाटन काल झाले, त्यात या आजारावर उपचार होतात काय ते पाहावे लागेल,’ अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

वाचा:

आम्ही शिवसेनेच्या वाटेने गेलो असतो तर शिवसेनेचे अस्तित्वच उरले नसते असा दावा शहा यांनी केला होता. त्यावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ‘शिवसेनेचं अस्तित्व संपविण्याची भाषा करणाऱ्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्रानं स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली. उलट भाजपच्या वाटेनं जात राहिली असती तर आजचा सुवर्ण कळस कधीच दिसला नसता. परमेश्वराची कृपा म्हणून भाजपला शब्द फिरविण्याची दुर्बुद्धी सुचली व शिवसेनेस हे ‘अच्छे दिन’ दिसले. त्याबद्दल महाराष्ट्राची जनता अमित शहा यांची सदैव ऋणी राहील, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आलाय. ‘अमित शहा व शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. शिवसेनासुद्धा जे करते ते ‘डंके की चोट’पर करते. तसे नसते तर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उघडपणे सत्ता स्थापन केली नसती,’ असंही शिवसेनेनं म्हटलंय.

नारायण राणेंवरही टीकास्त्र

अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असं वक्तव्य राणे यांनी शहांच्या दौऱ्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यावरून शिवसेनेनं राणेंवर तोफ डागली आहे. ‘एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर हे महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. शर्थ आणि पराकाष्ठा करूनही ‘ठाकरे सरकार’ सत्तारूढ होण्यापासून कोणी रोखू शकले नाही. आता महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या १२ आमदारांची नियुक्ती रोखली म्हणजे सरकारचा प्राण तडफडेल असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. या सर्व प्रकारात तुमचंच वस्त्रहरण झालं आहे. कोकणातही तेच घडलं. तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तिथं देवादिकांचं काय घेऊन बसलात,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं राणेंना हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here