मुंबई : जागतिक बाजारातील तेजीच्या लाटेवर आज भारतात सोने वधारले. गेल्या पाच सत्रात सोन्यातील घसरणीला आज ब्रेक लागला. आज मंगळवारी कमॉडिटी बाजारात सोने २०० रुपयांनी वधारले असून सोन्याचा भाव ४८ हजारांच्या नजीक पोहोचला.

अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर सोने दरात घसरण झाली होती. गेल्या आठवडाभरात सोने २५०० रुपयांनी स्वस्त झाले होते. तर ऑगस्टमधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत सोने ९००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १९४ रुपयांनी वधारला असून तो ४८०३० रुपये आहे. एक किलो चांदीचा भाव ७०२९४ रुपये असून त्यात २१० रुपये झाला आहे. सोने आणि चांदीमध्ये सोमवारी देखील किरकोळ वाढ झाली होती. सोमवारी सोने ९४ रुपयांनी वधारले होते आणि सोने दर ४६८७७ रुपयांवर बंद झाले.

आज जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.६ टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याचा भाव १८४१.११ डॉलर प्रती औंस झाला. सोमवारी सोने १८४२.३० डॉलर होता. तर चांदीचा भाव २७.५३ डॉलर झाला आहे. त्यात १ टक्के वाढ झाली आहे.

अमेरिकेतील आर्थिक पॅकेज आणि गोल्ड ईटीएफकडून होणाऱ्या खरेदीने जागतिक बाजारात सोने दरात तेजी आहे. त्याशिवाय करोना लसीकरण मोहिमेचा सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमॉडिटी विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. अमेरिकेत करोना आर्थिक पॅकेजचा फेर आढावा घेतला जाणार आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने सोने दराला बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

good returns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३६० रुपये झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७३६० रुपये झाला आहे. पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३६० रुपये असून २४ कॅरेटसाठी ४७३६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४१९० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०३९० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४६५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४८७१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४५० रुपये आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here