पोलिसांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओत मुंबईतील रस्त्यावरील वाहतूक कोंडी दाखवण्यात आली आहे. लाल सिग्नल असतानाही लोक हॉर्न वाजवताना दिसत आहेत. लाल सिग्नल असताना हॉर्न वाजवल्यावर तात्काळ हिरवा सिग्नल होईल, असं लोकांना वाटतं, पण ते चुकीचं आहे, असं या व्हिडिओतील सब-टायटल्समध्ये नमूद केलं आहे. उलट हॉर्न वाजवल्याने शांतता भंग होतो आणि इतरांना त्याचा त्रास होत असल्याचं या व्हिडिओतून दाखवण्यात आलं आहे. या शांतता भंगावर जालीम तोडगा काढण्यासाठीच ‘द पनिशिंग सिग्नल यंत्रणा’ शहरातील प्रत्येक चौकात बसवण्यात येणार असून विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना वेसन घालण्यात येणार आहे. या सिग्नल यंत्रणेद्वारे ध्वनिप्रदूषणास जबाबदार ठरणाऱ्या आवाजाचा डेसिबल मोजण्यात येणार आहे. त्यामुळे शांतता भंग करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळणार आहे. सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, हिंदमाता आणि वांद्रे अशा परिसरात प्रथम या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.
तोपर्यंत वाहतुकीतून सुटका नाही
‘द पनिशिंग सिग्नल यंत्रणा’ही विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना पनिशमेंट करण्यासाठी असणार आहे. समोर लाल दिवा लागल्यावर चालकांनी हॉर्न वाजविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आवाज जर ८५ डेसीबल पेक्षा वर गेला तर सिग्नलचा कालावधी आणखी वाढणार आहे. हा आवाज जितका वाढत जाईल तितका हा कालावधी वाढत जाईल. जोपर्यंत ध्वनिमापक यंत्राचा आवाज ८५ डेसीबलपेक्षा खाली येत नाही तोवर हिरवा दिवाच पेटणार नाही. त्यामुळे कारण नसताना हॉर्न वाजवणाऱ्यांना वाहतूक कोंडीतच अडकून राहावं लागणार असून अन्यथा पोलिसांना सहकार्य करावं लागणार आहे.
Horn not okay, please! असे म्हणत पोलिसांनी या यंत्रणेचे कॅम्पेन सुरू केले असून ही यंत्रणा लागू झाल्यावर काय होऊ शकते याची झलकही या व्हिडिओतून लागू करण्यात आली आहे. तसेच ‘उगा कशाला हॉsर्न वाजवी.. काना येईल बहिरेपणा… वृद्ध ,बालक अन् कुणी आजारी…. फिकीर त्यांची करा जरा…जी जी रं जी….’ असे म्हणत मुंबई पोलीसांनी ट्विटही केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times