पुणे: पुण्यातील येथील ४४ वर्षीय व्यक्तीचा चौघांनी पिस्तुलाच्या धाकावर अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर कारचालकाने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. सोमवारी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर सर्व्हिस रोड येथे हा थरार घडला.

सुरेशचंद्र जोशी यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, खाकी गणवेशातील व्यक्तीने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. काही अंतरावर आणखी तिघे जण कारमध्ये जबरदस्ती बसले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून जोशी कारमधून उतरले आणि धावत सुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील सर्व्हिस रोडनजीक साई मिलेनियम शॉपिंग सेंटरजवळ सोमवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. जोशी हे कार घेऊन काही खासगी कामानिमित्त जात होते. काही अंतरावर खाकी गणवेशातील एक व्यक्ती हातात काठी घेऊन जात होती. त्या व्यक्तीने लिफ्ट मागितली. सुरक्षा रक्षक असल्याचे जोशींना वाटले. त्यांनी त्या व्यक्तीला लिफ्ट दिली. ते महामार्गाच्या दिशेने जात असताना, त्या व्यक्तीने कार थांबवण्यास सांगितले. जोशींनी कार थांबवली असता, ती व्यक्ती समोरच्या सीटवर येऊन बसली. तिच्या हातात पिस्तुल होते. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. काही वेळाने आणखी तिघे कारमध्ये मागच्या सीटवर बसले. त्यामुळे जोशी घाबरले. चौथ्या व्यक्तीने त्यांना मागच्या सीटवर बसण्यास सांगितले. त्याचवेळी प्रसंगावधान राखून जोशी कारमधून खाली उतरले आणि धावत सुटले.

त्यानंतर जोशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, कार तिथेच सोडून चौघेही पसार झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून, तपास सुरू केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here