नवी दिल्लीः भारत-चीनमध्ये सैन्य कमांडर स्तरावर चर्चेच्या ९ व्या फेरीनंतर ( ) एकमत झाले आहे. चीन आणि भारतीय सैनिक आता पाँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून मागे हटत आहेत, असा दावा चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीवरून वृत्त दिले आहे. उभय देशांच्या सैन्यात बुधवारी झालेल्या चर्चेत एकमत झाल्यानंतर चिनी सैनिक आणि भारतीय जवान दक्षिण व उत्तर पांगाँग सरोवराच्या परिसरातून मागे हटत आहेत, असा दावा ग्लोबल टाइम्सने केला आहे.

जी सहमती झाली आहे त्यानुसार फिंगर 4 येथे दोन्ही बाजूंनी पेंट्रोलिंग होणार नाही. फिंगर 4 हा नो पेट्रोलिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सैनिक मागे हटवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. आता चिनी सैनिक फिंगर 8 कडे परतत आहे आणि तर भारतीय जवान धनसिंग थापा पोस्ट (फिंगर 2 ते फिंगर 3) कडे जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, पूर्व लडाखमधील सद्यस्थितीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उद्या राज्यसभेत निवदेन देतील, असं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

उभय देशांमध्ये गेल्या वर्षी मेमध्ये तणाव सुरू झाला होता. चिनी सैन्याने पँगाँग सरोवरावर आपला दावा केला होता. यावेळी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी १५ जूनला पेट्रोलिंगवर असलेल्या भारतीय जवानांच्या टीमवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. तर अनेक चिनी सैनिक मारले गेले. पण मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांच्या संख्येवर चीन अद्याप गप्प आहे.

त्यानंतर पूर्व लडाखमध्ये दोन्ही बाजूंनी सैन्य आणि शस्त्रे तैनात करण्यात आली. सीमेवर भारताने तोफखाना, बंदुका आणि सशस्त्र वाहने तैनात केली आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या ८ फेऱ्या झाल्या. पण त्यात कुठलाही तोडगा निघू शकला नाही. आता चर्चेच्या ९ व्या फेरीत उभय देशातील सैन्यांमध्ये सहमती झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here