म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः गेल्या १ एप्रिल २०२० पासून एकदाही न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे असे आवाहन त्यांनी केले. सोबतच थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचाः

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या व्हीडीओ कॉन्फरंन्सिग बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले की, सद्यस्थितीत पुणे (१०३२.८० कोटी), सातारा (१४०.३६ कोटी), सोलापूर (२५९.१२ कोटी), सांगली (१९२.५४ कोटी) व कोल्हापूर (३३७.४३ कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण १९६२ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी १२४७ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या १४ लाख २९ हजार ८११ वीजग्राहकांनी गेल्या १ एप्रिल २०२० पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल. परंतु त्याआधीच थकबाकीचा भरणा करून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाळे यांनी केले.

वाचाः

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १० महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक १२ लाख ६८ हजार ४८७ असून त्यांच्याकडे ८५६ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ लाख ३८ हजार ८७० वाणिज्यिक ग्राहकांकडे २६४ कोटी ३२ लाख आणि २२ हजार ४५४ औद्योगिक ग्राहकांकडे १२६ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे. वीजबिलांबाबत शंका, तक्रारींचे निरसन तसेच विनंती करून देखील प्रतिसाद नसल्याने या वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यातच खंडित करण्याची कटू कारवाई सुरु करण्यात येत असल्याचे नाळे यांनी स्पष्ट केले. या कारवाईसाठी पथके तयार करून आवश्यक संख्येत कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी इतर कार्यालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा या पथकांमध्ये समावेश करावा, अशी सूचना त्यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here