भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथील रहिवासी विशाल व त्याचे वडील शेतीचे काम आणि मजुरी करतात. वडिलांना शेतात काम असल्याने ते चिंचोली येथे विद्युत खांब उभारण्याच्या मक्तेदाराकडील कामासाठी गेले नाही. त्याऐवजी मुलगा विशाल हा कामावर गेला होता. वाघुर फिडरसाठी चिंचोली शिवारात विद्युत खांब उभारणीचे हे काम आहे. या कामासाठी विशालसह इश्वर शेळके, वसंत घ्यार सोनु सोनवणे, अक्षय घ्यार हे देखील गेले होते. ट्रॅक्टरवरील खांब हायड्रोलिकच्या साह्याने उचलून खड्ड्यात ठेवत असताना अचानक त्यांचा ट्रॅक्टर कलंडला. तो खांब थेट शेजारी असलेल्या ३३ केव्ही विद्युत प्रवाह असलेल्या खांबावर पडला. यामुळे ट्रॅक्टरमधील खांबात विद्युत प्रवाह आल्याने सर्वांना विजेचा धक्का लागला.
यात विशाल याचा जागेवरच मृत्यू झाला. अक्षय घ्यार याच्या मांडीत खांब घुसून जखमी झाला. इश्वर शेळके हे बेशुद्ध झाले. या अपघातानंतर चिंचोली गावातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. विशाल याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यावर मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल हा गायकवाड दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times