मुंबई इंडियन्सने आज ट्विटरवर एक पोल केला होता. या पोलमध्ये आमच्या संघात सात जागा रीक्त आहेत. या सात जागांमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी द्यायला हवी, असा प्रश्न मुंबई इंडियन्सने विचारला होता. त्यावेळी चाहत्यांनी यावेळी एकाच खेळाडूचे सर्वात जास्त नाव घेतले आहे. तो खेळाडू म्हणजे भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन.
या पोलमध्ये सर्वाधिक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सने आपल्या संघात अर्जुन तेंडुलकरला जागा द्यायला हवी, असे म्हटले आहे. त्याचबरोबर कुदीप यादव, मोईन अली, सिद्धेश लाड, शिवम दुबे, तुषार देशपांडे, हरभजन सिंग या खेळाडूंची नावं चाहत्यांनी मोठ्या संख्येने घेतली आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन हा चाहत्यांचा कौल किती गंभीरपणे घेते, हे लवकरच कळणार आहे.
अर्जुन जलद गोलंदाज आहे आणि त्याने भारतीय संघ तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. अर्जुनने या वर्षी सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने हरियाणा आणि पुद्दुचेरी विरुद्ध सामने खेळले होते. मुश्ताक अली स्पर्धेत अर्जुनने दोन सामन्यात ६७ धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या.
अर्जुनची आयपीएलच्या लिलावासाठी बेस प्राइज (मूळ किंमत) यावेळी ठरवण्यात आली आहे. या किंमतीवरुन अर्जुनच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. या लिलावासाठी अर्जुनची बेस प्राइज ही २० लाख रुपये ठेवल्याचे समजते आहे. त्यामुळे अर्जुनवर या २० लाखांच्या वर लिलावात बोली लागू शकते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times