चेन्नई, : इंग्लंडचा कर्णधार जो रुट हा भन्नाट फॉर्मात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रुटला लवकर बाद करता आले नव्हते. रुटने आपल्या शंभराव्या सामन्यात द्विशतक झळकावत इंग्लंडला विजय मिळवून दिला. पण आता रुटला लवकर बाद करण्याचा मास्टर प्लॅन तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जो रुटला लवकर बाद करण्यासाठी आता भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारी हा पुढे सरसावला आहे. तिवारीने एक प्लॅन सांगितला आहे आणि तो कसा करायचा, याचे चित्रही त्याने काढून दाखवले आहे. त्यानुसार जर भारतीय संघाने रणनिती आखली तर रुट लवकर बाद होऊ शकतो, असे तिवारीला वाटत आहे.

काय आहे हा मास्टर प्लॅन, पाहा…
तिवारीने ट्विट करत हा मास्टर प्लॅन सांगितला आहे. तिवारीने म्हटले आहे की, ” चेन्नईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. ज्यावेळी आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे गोलंदाजी करत असतील तेव्हा ऑफ साइडला फक्त दोनच खेळाडू ठेवायचे. त्यामधील एक खेळाडू हा शॉर्ट थर्ड मॅन आणि दुसरा खेळाडू हा मिड ऑफला उभा असेल. त्याचबरोबर ऑन साईडला यावेळी सात खेळाडू ठेवायचे. यामध्ये लेग स्लिप, शॉर्ट गेल, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, डिप स्क्वेअर लेग, स्क्वेअर लेग आणि डिप मिड विकेट येथे हे सात खेळाडू उभे करायचे.”

जो रुटने पहिल्या कसोटी सामन्यात रिव्हर्स स्विपचा आणि स्विप या फटक्यांचा जास्त वापर केला होता. त्यामुळे जेव्हा रुट रिव्हर्स स्विपचा फटका खेळायला जाईल आणि जेव्हा त्याची एज लागेल तेव्हा त्याचा झेल पकडता येईल. त्याचबरोबर स्विप मारताना चेंडू हवेत गेला तर स्क्वेअर लेगला उभा असलेला खेळाडू त्याचा झेल पकडू शकेल.

तिवारीने रुटला लवकर बाद करण्यासाठी ही अनोखी रणनिती आखलेली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही फिरकीपटू गोलंदाजी करत असताना तिवारीने स्लिपला खेळाडू ठेवलेला नाही. त्यामुळे ही रणनिती काही तरी विचार करुन तिवारीने बनवल्याचे पाहायला मिळते आहे. पण ही रणनिती भारतीय संघापर्यंत पोहोचणार का आणि ते या रणनितीचा आवलंब करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here