म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सर्वसामान्यांसाठी काही प्रमाणात सुरू झाल्यानंतर करोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांत दररोजच्या रुग्णसंख्येत २००हून अधिक वाढ होत असल्याने महापालिकेने सावधगिरीचा इशारा दिला आहे. दरम्यान, रुग्णवाढीमुळे प्रवाशांना अद्याप तरी लोकलमध्ये पूर्णवेळ प्रवास करता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिवसभर प्रवासाची मुंबईकरांची मागणी तूर्तास पूर्ण होणे अवघड आहे.

मुंबईकरांची अद्यापही करोनाच्या विळख्यातून सुटका झालेली नाही. मात्र नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्याने राज्य सरकारने दोन पावले मागे घेत काही नियम शिथिल करत १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा दिली. रेल्वे सुरू झाल्यानंतर रुग्णवाढीचा अंदाज असल्याने पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तर दुसरीकडे १ ते १० फेब्रुवारीपर्यंतचा आढावा घेतल्यास दररोजच्या रुग्ण संख्येत २०० ते २२५ने चढउतार कायम असल्याचे आढळून आले आहे. लोकल प्रवासात वेळेची बंधने असली तरी गेल्या दहा दिवसांपासून पूर्वीप्रमाणे लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. परिणामी रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सांगितले जाते. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, ‘सध्या सुरू असलेली रुग्णवाढ ही रेल्वे प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे होत आहे, असे ठोस सांगता येणार नाही. आम्ही चाचण्यांची संख्या देखील वाढवली आहे. त्यामुळेही संख्या वाढू शकते, असा दावा केला. मात्र काही प्रमाणात रुग्ण वाढत असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने लोकल प्रवासाच्या सध्या असलेल्या वेळा कायम ठेवाव्यात, त्यात कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत’, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

वाचा:

करोना नियंत्रणात येत असल्याने मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १४७वर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी ही संख्या सुमारे चारशेच्या घरात होती. सीलबंद इमारतींची संख्याही आता घटू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी तीन ते साडेतीन हजार इमारती सीलबंद होत्या. ही संख्या १८५६वर आली आहे. करोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सुमारे २५०० नागरिकांचा शोध घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलच्या वेळा वाढवण्यात आल्याने रूग्ण संख्येत वाढ होत आहे, का याचा आढावा प्रशासन घेत आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हा आढावा सुरू राहणार असून तोपर्यंत लोकलच्या वेळा वाढवू नयेत, असे निर्देश रेल्वेला दिले आहेत. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here