वाचा:
राजभवनाने राज्यपालांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपालांना विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपालांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा:
वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
राज्यपाल यांचा आज मसूरी येथे नियोजित दौरा होता. डेहराडून येथून ते मसूरीला जाणार होते. त्यानुसार डेहराडूनला जाण्यासाठी ते सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर पोहचले. तिथे ते शासकीय विमानत बसले. मात्र, १५ मिनिटानंतर या विमानातून प्रवास करण्यास राज्यपालांना परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर खासगी कंपनीच्या विमानाने राज्यपाल डेहराडूनला रवाना झाले. या सर्व प्रकारावर राजभवनाने आधीच स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानुसार राजभवन सचिवालयाने २ फेब्रुवारी रोजीच महाराष्ट्र सरकारकडे रितसर शासकीय विमानासाठी परवानगी मागितली होती. त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही कळवण्यात आले होते, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. यावर आता शासनाकडूनही स्पष्टीकरण आले असून हे प्रकरण गंभीर वळण घेण्याची दाट शक्यता आहे. या प्रकारावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांतून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. सरकारला नियमात राहूनच काम करावं लागतं, असे सांगत सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी यात काहीही गैर नसल्याचे म्हटले आहे तर विरोधी पक्षनेते यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारने पोरखेळ चालवला आहे, असे म्हणत निशाणा साधला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times