सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनच्या (सीडीसी) अहवालानुसार, डिस्पोजेबल सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क वापरल्यास विषाणूपासून ९५ टक्के अधिक सुरक्षिता मिळू शकणार आहे. सर्जिकल मास्कच्यावर कपड्यांचा मास्क लावल्यास पहिल्या मास्कच्या बाजूने हवा आत जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मास्क पूर्णपणे फिट असल्याने हवा तोंड, नाकावाटे शरिरात जात नाही आणि त्यामुळे नव्या स्ट्रेनपासून बचाव होऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे.
सीडीसीचे संचालक रोचेल वार्लेस्की यांनी सांगितले की, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आल्यामुळे करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर कमी झाला आहे. सीडीसीचे वैद्यकीय अधिकारी जॉन टी ब्रुक्स यांनी सांगितले की, करोनापासून बचाव करण्यासाठी मास्क प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी दोन मास्क लावण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून या महासाथीच्या आजारावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
वाचा:
तीन स्तर असलेला सर्जिकल मास्क कफमधून निघाणाऱ्या कणांना ४२ टक्क्यांपर्यंत रोखतो. तर तीन स्तर असलेला कपड्यांचा मास्क ४४ टक्के कणांना रोखतो. मात्र, जेव्हा सर्जिकल मास्कवर कपड्यांचा मास्क वापरला तर ९२ टक्के कणांना रोखता येऊ शकते. लोकांनी मास्क योग्य प्रकारे लावण्याचे आवाहन सीडीसीने केले आहे. आपल्या जवळपासच्या नागरिकांनी दोन मास्कचा वापर केला असेल तर संसर्गापासून ९५ टक्क्यांपर्यंत सुरक्षिता मिळू शकते.
करोनापासून वाचण्याचे अन्य उपाय
सीडीसीच्या अहवालात, करोनापासून बचाव करण्यासाठी अन्य उपायांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वायूविजन खराब अवस्थेत असलेल्या खोलीत जाणे टाळणे, सोशल डिस्टेंसिंग आणि साबणाने सारखं हात स्वच्छ करणे आदी उपाय सीडीसीने सुचवले आहेत.
५० देशांत करोनाचा नवा स्ट्रेन
करोनाचा नवा स्ट्रेन अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक युरोपीयन देशांमध्ये फैलावत आहे. जवळपास ५० देशांमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. त्यामुळेच जर्मनी, ऑस्ट्रेलियाने सार्वजनिक स्थळी अथवा सुपर मार्केटमध्ये जाणाऱ्यांनी अधिक सुरक्षित मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times