मुंबई : देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल २९ पैसे तर डिझेल ३५ पैशांनी महागले आहे.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९४.६४ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.३२ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.१४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७८.३८ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९०.४४ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८३.५२ रुपये भाव आहे.

कोलकात्यात आज पेट्रोल ८९.४४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८१.९६ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९१.०९ रुपये असून डिझेल ८३.०९ रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीवर विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ६१.६४ डॉलर असून त्यात ०.३३ डॉलरची वाढ झाली. तर लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव ०.३५ डॉलरने घसरला आणि ५७.८९ डॉलर झाला.

दीड महिन्यात १६ वेळा दरवाढ
पेट्रोलियम कंपन्यांनी नव्या वर्षात आतापर्यंत १६ वेळा इंधन दरवाढ केली आहे. यात आतापर्यंत पेट्रोल ४ रुपये ३३ पैशानी महागले आहे तर डिझेल ४ रुपये ५१ पैशानी महागले आहे. इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा आढावा घेतला जातो.

पेट्रोल-डिझेलच्या एक्साइज शुल्कातून २० लाख कोटींची कमाई
भाजप सरकारनं गेल्या सहा वर्षांत पेट्रोलवर एक्साइज शुल्कात २३.७८ रुपये प्रती लीटर तर डिझेलवर २८.३७ रुपये प्रती लीटरची वाढ केली. म्हणजेच, पेट्रोलच्या एक्साइज शुल्कात २५८ टक्क्यांनी तर डिझेलच्या एक्साइज शुल्कात ८२० टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. ज्यातून गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या एक्साइज शुल्कातून जवळपास २० लाख कोटी रुपये कमावलेत’ असा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी काॅंग्रेसने केला होता.

भारतात इंधनावर सर्वाधिक कर भारतात पेट्रोल आणि डिझेलवरील कर हा सर्वाधिक आहे. इंधनावरील कराचे प्रमाण युरोपात देखील जास्त आहे. इटली इंधनावर तब्बल ६४ टक्के आकारला जातो. फ्रान्स आणि जर्मनीत ६३ टक्के आणि ब्रिटनमध्ये ५३ टक्के कर आहे. आशियाचा विचार केला तर भारत पेट्रोल आणि डिझेल महाग आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या प्रत्येक लिटरवर एक रुपया उत्पादन शुल्क वाढल्यास केंद्र सरकारने वर्षाकाठी १३००० ते १४००० कोटींचा अतिरिक्त कर महसूल मिळतो.

भारतीयांच्या नशिबी इंधन महागच कारण तेल वितरक कंपन्याचे मार्जिन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा स्थनिक कर ,उत्पादन शुल्क, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स (VAT), अधिभार (cess) यांनी मिळून जवळपास ७० टक्के कराचा भुर्दंड ग्राहकांच्या माथी मारण्यात आला आहे. आजच्या घडीला इंधनावरील कर भरून ग्राहकांचे कंबरडे मोडले असून पेट्रोलियम कंपन्या आणि पर्यायाने सरकार तुंबड्या भरत आहे, असा आरोप जाणकारांकडून करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here