ज्या सहा खेळाडूंना बीसीसीआयची दोन किमी फिटनेस टेस्ट पास करता आली नाही, त्यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन, नितिश राणा, राहुल तेवतिया, सिद्धार्ध कौल आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेस कसा आहे हे तपासण्यासाठी नवी २ किमीची टेस्ट सुरू केली होती. पण ही टेस्ट वरील सहा खेळाडू पूर्ण करू शकले नाही.
वाचा-
बीसीसीआयने या आठवड्यात बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेस टेस्टचे आयोजन केले होते. टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही एक नवी फिटनेस टेस्ट असल्याने सर्वांना काही वेळ दिला गेला आहे. जेणेकरून ते पुन्हा एकदा टेस्ट देऊ शकतील. पण जर यावेळी ते टेस्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले तर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता कमी आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. याआधी बीसीसीआयने फिटनेस टेस्ट आयोजित केला होती. २०१८ साली संजू सॅमसन, मोहम्मद शमी, अंबाती रायडू हे यो-यो टेस्ट पास करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना इंग्लंड दौऱ्यात संधी दिली गेली नव्हती.
वाचा-
एकूण २० क्रिकेटपटूची फिटनेस टेस्ट करण्यात आली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट आयोजित केली जाणार आहे. यात यो-यो टेस्ट आणि नवी २ किलोमीटर धावण्याच्या फिटनेस टेस्टचा समावेश केला गेलाय.
या टेस्टमध्ये एक फलंदाज, विकेटकिपर अथवा फिरकीपटूला ८ मिनिट ३० सेंकदात दोन किमीचे अंतर पार करावे लागते. तर गोलंदाजाला ८ मिनिट १५ सेंकदात हे अंतर पार करावे लागते. सहा खेळाडूंना ही टेस्ट पास करता आली नाही. काही खेळाडूंनी कशीबशी ही टेस्ट पास केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times