निर्मला सीतारामन या शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या स्वभावाची झलक अर्थातच अर्थसंकल्पात पाहायला मिळाली. सर्वच बाबतीत आर्थिक शिस्त यावी या दृष्टीने त्यांनी आकड्यांची जुळवाजुळव करून ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला. सीतारामन यांचं आजचं अर्थसंकल्पीय भाषण मॅरेथॉन ठरलं. त्या सलग १६० मिनिटं बोलल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शेवटची दोन पाने त्या वाचू शकल्या नाहीत. अगदी सुटसुटीतपणे सीतारामन यांनी जटील आकड्यांची मांडणी केली. शेअर बाजाराला मात्र सीतारामन यांचा अर्थसंकल्प फारसा पचनी पडला नाही. बाजारात सकाळपासूनच मरगळ पाहायला मिळाली. दुपारपर्यंत सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला होता.
> ‘कृषी, किसान आणि कमाई’ या त्रिसुत्रीवर सीतारामन यांनी भर दिला. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची ही ओळख अधिक ठळक व्हावी म्हणून बळीराजाला सीतारामन यांनी भरभरून दान दिलं. शेतीला व शेतकऱ्याला तरतरी आणण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्यही मोदी सरकारने ठेवले आहे.
> नोकरदारांच्या नजरा कररचनेवर होत्या. अपेक्षेनुसार कर बऱ्यापैकी सुकर करण्यात आला आहे. कररचनेत काही बदल करण्यात आले असले तरी जुनी किंवा नवी अशी कोणतीही एक कररचना स्वीकारण्याचा पर्याय करदात्यांना खुला ठेवण्यात आला आहे.
> अलीकडच्या काळात अनेक बँका विविध कारणांनी डबघाईला आल्या. त्यामुळे सामान्य ठेवीदारांमध्ये एकप्रकारचे भीतीचे वातावरण आहे. या ठेवीदारांना भयमुक्त करण्यासाठी महत्त्वाकांक्षी पाऊल सीतारामन यांनी उचलले आहे. बँक ठेवींना आता एक लाखांऐवजी पाच लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय सीतारामन यांनी घेतला आहे.
> ‘गरिबी हटाव’साठी सरकारने ठोस पावले टाकली असून आतापर्यंत २७ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर काढण्यात यश आले आहे. येत्या काळात गरिबीचं मुळापासून उच्चाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times