दुचाकीचा पादचाऱ्यास धक्का लागला अन् वादाला सुरुवात झाली. शिवीगाळीपासून झालेली सुरुवात हाणामारीपर्यंत पोहोचली. यामुळे गलितात्रत असलेल्या एम. जी. रोडवरील वाहतुकीस ‘जॅम’ लागला. भररस्त्यातील वादामुळे किमान अर्धा तास येथील वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते.
सरकारवाडा पोलिसांनी भांडण करणाऱ्यांना पोलिस ठाण्यात नेले. मात्र, तेथे दोघांनी वादावर पडदा टाकण्याची सामंजस्याची भूमिका घेतली अन् प्रकरणावर पडदा पडला. मात्र, एम. जी. रोडवरील पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मुळात अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे येथे वाहतुकीसाठी फारच अरुंद रस्ता उपलब्ध होतो. शेकडो आस्थापना असलेल्या इमारतींना पार्किंगच नसल्याने वाहनांचा रस्त्यावर महापूर असतो. पादचाऱ्यांनासुद्धा चालण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांना रस्त्यावर उतरावे लागते. शुक्रवारी दुपारी असेच घडले. पायी जाणाऱ्या तरुणास दुचाकीचा धक्का लागला. पाहता पाहता दोघांमध्ये वाद आणि हाणामारी झाली.
…तर टळला असता खोळंबा
भररस्त्यात हाणामारीचा प्रकार सुरू झाल्याने लागलीच वाहतूक कोंडी झाली. हा प्रकार सरकारवाडा पोलिसांना कळताच बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लागलीच दोन तरुणांना पोलिस ठाण्यात हजर केले. मात्र, पोलिस ठाण्यात या दोघांनी तक्रार देण्यापेक्षा तडजोडीचा पर्याय स्वीकारत काढता पाय घेतला. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. वास्तविक हा समजदारपणा तरुणांनी रस्त्यावर दाखवला असता, तर वाहतूक कोंडी, वाद आणि पोलिसांना पाचारण या बाबी टाळता आल्या असत्या अन् अर्धा तास वाहतुकीचा खोळंबाही झाला नसता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times