म. टा. प्रतिनिधी, : पोलिसांनी चिकाटीने तपास केला तर, आरोपींनी कोणताही पुरावा न सोडलेल्या गुन्ह्यांचाही तपास लागू शकतो. पोलिसांनीही अशाच एका हत्येच्या घटनेचा छडा लावला आहे. शिर नसलेल्या मृतदेहाची शर्टावरील टेलर मार्कच्या आधारे ओळख पटवली आणि त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पुणे जिल्ह्यातील व्यक्तीला तेथील आरोपींनी श्रीगोंदा तालुक्यात आणून त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी पाच जणांना अटक केली. चार दिवसांतच हा तपास पूर्ण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारात ८ फेब्रुवारीला शिर कापलेल्या अवस्थेतील पुरुषाचा पुरलेला मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटवणे हेच पोलिसांपुढील मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांच्या पथकाने हा आव्हानात्मक तपास सुरू केला. मृतदेह कुजला होता. शिर नसल्याने ओळख पटवणेही अवघड. अशा परिस्थितीत मृतदेहाच्या शर्टावर टेलरचे नाव होते. शुभम टेलर्स, पुणे ४६ एवढेच नाव त्यावर होते. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. परिसरातील मोबाइल टॉवरवरून डेटा घेतला. त्याचे विश्लेषण करण्यात आले. पोलिसांनी पुण्यात जाऊन हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी मिळविल्या. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मिळतीजुळती नोंद आढळून आली. रमेश सदाशिव जाधव (रा. आंबेगाव, जि. पुणे) हे २ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची नोंद होती. त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्यावर ते शुभम टेलर्सकडूनच कपडे शिवून घेत असल्याचे समजले. त्यानंतर नातेवाइकांकडून मृताची ओळख पटविण्यात आली.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला. त्यासाठी मोबाइल टॉवरवरून मिळालेल्या माहितीचा उपयोग झाला. पुणे जिल्ह्यातील जे संशयित या भागात येऊन गेल्याचे आढळले, त्यांच्याकडे चौकशी सुरू झाली. बारामती, पाटण सातारा, कोळसेवाडी, कल्याण येथून तेजस भोसले, राजेश विठ्ठल गायकवाड, अमोल गोविंद कांबळे, प्रशांत बजरंग साबळे यांच्यासह एका महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. मृत जाधव हा एका महिलेला त्रास देत असल्याने कट रचून केल्याची कबुली आरोपींनी दिली. जाधव याला जमीन दाखवण्याच्या बहाण्याने बारामती तालुक्यातील मळेगाव येथे बोलवण्यात आले. तेथून रात्रीच त्याला सिद्धटेकमार्गे श्रीगोंदा तालुक्यात आणले. तेथे धारदार शस्त्राने त्याचा खून केला. त्याचे शिर धडावेगळे करून पुरले. दुसऱ्या दिवशी आरोपींनी ते शिर पुन्हा बाहेर काढून जाळून टाकले. ओळख पटू नये यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच दिलीप तेजनकर, विठ्ठल पाटील, अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, दादा टाके, किरण बोराडे, अमोल कोतकर, विनायक जाधव, संजय काळे, गोकुळ इंगवले, राजु भोर, किरण जाधव, प्रशांत राठोड यांच्या पथकाने हा तपास केला. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या पथकाचे कौतुक केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here