सामन्याच्या पहिल्या दिवशी पंत आणि बेन स्टोक्स यांच्यामध्ये वादावादी झाली होती. त्यामुळे पंतने फलंदाजी करण्यास नकार दिला होता. त्यावेळी पंतने स्टोक्सला दमही दिला होता आणि स्टोक्सने पंतला पुन्हा एकदा डिवचले होते. पण आज स्टोक्सला क्लीन बोल्ड करत अश्विनने या प्रकरणाचा बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. अश्विनची ही विक्रमी विकेट ठरली. कारण स्टोक्सला बाद करत अश्विनने भारताच्या हरभजन सिंगला विकेट्च्या बाबतीत मागे टाकले.
पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं पाहा…
पहिल्या डावात भारतीय संघ फलंदाजी करत असताना ही गोष्ट घडली ती ८७व्या षटकात. ज्यावेळी इंग्लंडने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसारख्या स्थिरस्थावर झालेल्या खेळाडूंना बाद केले होते. त्यानंतर पंतचा मोठा अडसर त्यांच्या मार्गात असल्याचे पाहायला मिळत होते. त्यावेळी ८७व्या षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर पंत हा बॅटींगसाठी उत्सुक नसल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यापूर्वी स्लिपमध्ये उभा असलेल्या बेन स्टोक्सने त्याच्याबद्दल काही तरी टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी पंतने शब्द जरा जपून वापर, असे म्हटल्याचे व्हिडीओमध्ये ऐकायला मिळाले.
रिषभ पंत फलंदाजी करत नसल्याचे पाहिल्यावर स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांनी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंतने फलंदाजीला पुन्हा सुरुवात केली. त्या चेंडूनंतर पुन्हा एकदा पंतने पंचांकडे पाहिले आणि त्यानंतरच्या चेंडूवर पंतने एकेरी धाव घेतली. या एकेरी धावेसह पंतने आपल्याकडेच स्ट्राइक ठेवल्याचे पाहायला मिळाले. हे षटक संपल्यावर पुन्हा एकदा पंत आणि स्टोक्स यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times