चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली. मी पहिल्यांदाच सर्वात मोठं बजेट भाषण ऐकलं, असा चिमटा काढताना हे भाषण १६० मिनिटाचं होतं. या भाषणातून २०२०-२०२१साठी काय संदेश द्यायचा होता, हे मला कळलं नाही. या भाषणात मला कोणताही अविस्मरणीय विचार किंवा घोषणाही दिसली नाही, अशी टीका चिदंबरम यांनी केली.
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची आशा सरकारने सोडली आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे हे सरकारने मान्य केलं आहे. मात्र, अर्थव्यवस्था सुधारण्यावर त्यांचा विश्वास नाही, असा हल्ला त्यांनी चढवला. अर्थमंत्र्यांनी आर्थिक समीक्षा वाचली नाही का? असा सवाल करतानाच अर्थमंत्र्यांनी आर्थिक समीक्षा वाचलीच नसावी, असं मला वाटतं, असंही ते म्हणाले. जनतेला असा अर्थसंकल्प नको होता. त्यासाठी जनतेने भाजपला मतदान केलं नव्हतं, असा टोलाही त्यांनी भाजपला हाणला.
अर्थसंकल्पातील ठळक घडामोडी
>> एलआयसीमधील मोठी भागीदारी विकणार; आयडीबीआयमधील सरकारी भागीदारी कमी करणार
>> लघु-मध्यम उद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य
>> बँकेतील ठेवींना ५ लाखांचे विमा कवच देणार
>> लडाखच्या विकासासाठी ५ हजार ९०० कोटी, तर जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी ३२ हजार कोटी रुपये देणार
>> देशातील पर्यटन विकासासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद
>> एससी आणि ओबीसींसाठी ८५ हजार कोटी, एसटीसाठी ५३,७०० कोटी रुपयांची तरतूद
>> ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद
>> महिलांच्या पोषण आहारावर भर; यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
>> शिक्षणासाठी ९९ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद
>> शेतकऱ्यांसाठी किसान रेल सुरू करणार
>> कृषी क्षेत्रासाठी १६ सूत्री कार्यक्रम राबवणार; राज्य सरकारचा अंमलबजावणीत समावेश असेल
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times