म. टा. प्रतिनिधी, नागपूर

शहरात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर नियमांची अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. याअंतर्गत सोमवारी उपद्रव शोध पथकाने नरेंद्रनगरातील तुकाराम सभागृहातील एका लग्न समारंभात निर्धारित संख्येपेक्षा अधिक लोक आढळून आल्यानंतर लग्न समारंभ असलेले कुटुंबीय व सभागृहाच्या संचालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. अलीकडच्या काळातील याप्रकारच्या पहिल्याच कारवाईने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वसंतपंचमीच्या मुहुर्तावर मंग‌ळवारी मोठ्या प्रमाणात शहरात लग्नसमारंभ असल्याने याठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

गेल्या काही दिवसात शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले आहे. तसेच बाजारपेठांमध्येही व्यावसायिकांना खबरदारीच्या अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास दुकानदारांवर कारवाईबरोबरच बाजारपेठा एक दिवसाआड करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रशासनाने लग्न समारंभामध्ये पाहुण्यांच्या संख्येबाबत नियमावली जाहीर केली होती. यात ५०पेक्षा अधिक पाहुण्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शहरातील लग्न समारंभांमध्ये मोठी गर्दी दिसू लागली. विशेष म्हणजे या नियमात प्रशासनाने कुठलाही बदल केला नसताना नागरिकांकडून सर्रासपणे याचे उल्लंघन होताना दिसत होते. मात्र, करोना रुग्णांची गेल्या काही दिवसातील वाढती संख्या लक्षात घेता आता प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचअंतर्गत सोमवारी नरेंद्रनगरातील तुकाराम सभागृहात सुरू असलेल्या लग्न समारंभात निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक पाहुणे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.

-तर , लॉन सील

शासनाद्वारे निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या आढळल्यास संबंधित मंगल कार्यालय, लॉन सील करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. मनपाच्या शोध पथकाने प्रत्येक मंगल कार्यालय, लॉनवर नजर ठेवली आहे.

चाचणीचा अहवाल २४ तासांत द्या

शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी खंडित करण्यासाठी महापालिकेने चाचणीची गती वाढविली आहे. मात्र चाचणी केल्यानंतर रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये व त्याला त्वरित उपचार मिळावे यासाठी सर्व शासकीय व खासगी लॅबनी अहवाल २४ तासांच्या आत देण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी दिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here