म. टा. प्रतिनिधी, पुणे

”द्वारेच शंभर टक्के टोलवसुलीच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी खेड-शिवापूर टोलनाक्यासह जिल्ह्यातील सर्वच टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’ यंत्रणा सुरळीत असल्याचे दिसून आले. ‘फास्टॅग’ नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारणी केली जात होती. ‘फास्टॅग’ असलेली वाहने मात्र अल्प वेळेत टोलनाक्यांवरून मार्गस्थ होत होती.

‘चारचाकीच्या काचेवर बसविलेला ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग’ (आरएफआयडी) व्यवस्थित स्कॅन होत नाही,’ ‘टोल देण्यासाठी ‘फास्टॅग’च्या खात्यात पुरेसा ‘बॅलन्स’ नाही, त्यामुळे दुप्पट टोल द्यावा लागला’, अशा तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात होत्या. त्यातून किरकोळ वादाचे प्रकारही टोलनाक्यांवर निदर्शनास येत होते.

वाचा:

देशभरातील सर्व टोलनाक्यांवर सोमवारी मध्यरात्रीपासून टोल वसुलीसाठी ‘फास्टॅग’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर दहापैकी आठ मार्गिकांत ‘फास्टॅग’ स्कॅनर बसविण्यात आले होते. टोल कर्मचाऱ्यांकडून ‘फास्टॅग’ तातडीने स्कॅन करून दिला जात होता. त्यामुळे ‘फास्टॅग’धारक वाहने सुरळीतपणे टोलनाका ओलांडून जात होती. ‘फास्टॅग’ नसलेली वाहने या मार्गिकेत आल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल घेतला जात होता; शिवाय पहिल्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठीही नेहमीच्या दोन मार्गिकाही सुरू होत्या. या मार्गिकेत वाहनांची रांग होती.

वाचा:

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची मात्र पुरती धावपळ होत होती. ‘ट्रक’सारख्या उंच, अवजड वाहनांच्या काचेवरील ‘आरएफआयडी टॅग’ स्कॅन करण्यासाठी वाहनावर चढावे लागत होते किंवा चालकाच्या हातात ‘स्कॅनर’ द्यावा लागत होता.

दुप्पट टोलचा भुर्दंड

‘फास्टॅग’ नसल्याने दुप्पट टोलचा भुर्दंड भरावा लागल्यानंतर वाहनचालक टोलनाक्याजवळच्या बँका आणि डिजिटल वॉलेट कंपन्यांच्या स्टॉलवर जाऊन ‘फास्टॅग’ खरेदी करीत होते. या स्टॉलवर चालकांच्या आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकचा वापर करून ‘फास्टॅग’ प्रणाली कार्यान्वित करून दिली जात होती. ‘गेल्या दोन दिवसांत दुप्पट टोल भरलेल्या हजारहून अधिक प्रवाशांनी आणखी भुर्दंड नको; म्हणून ‘फास्टॅग’ बसवून घेतला,’ असे एका बँकेच्या स्टॉलवरील प्रतिनिधीने सांगितले.

‘पुरेशा बॅलन्सची खात्री करा’

‘फास्टॅग’शी संलग्न बँक खात्यात पुरेसा ‘बॅलन्स’ नसल्याने; तसेच ‘डिजिटल वॉलेट’शी जोडलेले ‘फास्टॅग’ रिचार्ज केले नसल्याने काही वाहनचालकांना दुप्पट टोलचा दंड भरण्यास टोल कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याला काही वाहनचालकांनी नकार दिला. त्यातून चालक आणि टोल कर्मचाऱ्यांत वाद झाले. काही वाहनचालक टोलनाका येण्यापूर्वी ‘फास्टॅग’शी संलग्न बँक खात्यात पैसे भरत होते. टोलनाका येईपर्यंत पैसे जमा झाले नसल्याने, ‘फास्टॅग’ कार्यान्वित दाखवत नव्हते. त्यामुळे त्यांनाही दुप्पट टोलचा भुर्दंड बसला. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वीच ‘फास्टॅग’च्या खात्यात पुरेसा ‘बॅलन्स’ आहे की नाही, हे तपासा, असा सल्लाही टोल कर्मचाऱ्यांनी दिला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here