पूजा चव्हाण ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील असून तीनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तर, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव घेऊन आरोप केला आहे. तसंच, सोशल मीडियावर या प्रकरणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपनं राठोड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे बंजारा समाज संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा या गावच्या सरपंचानं भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
वाचाः
सरपंच कमल नाथराव चव्हाण असं या सरपंचाचं नाव असून त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. तसंच, वनमंत्री संजय राठोड यांचं समर्थनही केलं आहे.
वाचाः
राजीनाम्यात काय म्हटलंय?
‘मी कमल नाथराव चव्हाण, काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील सरपंच म्हणून मी माझ्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचे कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपा पक्षातील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपवण्याचे कटकारस्थान करत असल्याचं मला जाणवत आहे,’ असा आरोप कमल चव्हाण यांनी केला आहे.
वाचाः
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असून, पक्षाची प्रतिमा वाचविण्यासाठी राठोड यांनी राजीनामा द्यावा, यासाठी शिवसेनेतील एक गट आग्रही आहे. तर, धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली नसताना आपल्या मंत्र्यावर कारवाई कशाला, असा सवाल दुसऱ्या गटाकडून केला जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times