गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आधीही त्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पवारांनी त्यात लक्ष घालावं, अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. त्यांनतर आज पुन्हा उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत मराठा आरक्षणाप्रश्नी एक निवेदन दिलं आहे.
वाचाः
‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाप्रकरणी दोन अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यातील एका अर्जात सर्व राज्य सरकारना प्रतिवादी करण्याची विनंती केली आहे. तर, दुसऱ्या अर्जात ११ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. जर अशा पद्धतीने खटल्यांचे कामकाज सुरु राहिले तर इतर खटल्यांप्रमाणे ही केसपण प्रलंबित राहील,’ असं उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
‘केस प्रलंबित राहिल्यास मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण होईल. आजही समाजात या दिरंगाईची खदखद वेगवेगळ्या रुपाने बाहेर येताना दिसत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात तुम्ही स्वतः लक्ष घालावे. तसेच, मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करु नये. तशा सूचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावाला, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
वाचाः
उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावर वेधले लक्ष
जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का?
जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ?
ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ?
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल.
MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या २१५० उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही?
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times