आत्महत्या प्रकरणामुळं राज्याचे वनमंत्री व शिवसेनेचे नेते संजय राठोड अडचणीत सापडले आहे. पूजाच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर, संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील राठोड यांच्या राजीनाम्याबाबत सावध भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा घेतलाल संपूर्ण आढावा

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या क्लिपमध्ये ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचं संभाषण असून तो आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे थेट नाव घेऊन आरोप केले आहेत. संजय राठोड यांनी तातडीने राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजपकडून होत आहे. तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी करत पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना पत्रही लिहलं आहे. भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरण्यात येत आहे.

वाचाः

एकीकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र याबाबत अद्याप संयमी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून तथ्य आढळल्यास कारवाई करु, असे स्पष्ट संकेत दिले असले तरी अजूनही मंत्री राठोड यांच्याबाबत बोलणं त्यांनी टाळलं आहे. तसंच, गेले काही महिने लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यामुळं एकाअर्थी या प्रकरणात मुख्यमंत्री सबुरीने निर्णय घेत असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणात शिवसेना नेत्यांना याबाबत प्रतिक्रिया न देण्याच्या सूचनाही मातोश्रीवरुन करण्यात आल्या असल्याची माहिती मिळतेय. अद्याप शिवसेनेच्या एकाही बड्या नेत्यांनं या प्रकरणात प्रतिक्रिया दिली नाहीये. शिवसेनेचे खासदार संजय राऊत व एकनाथ शिंदे यांनीही चौकशी पूर्ण झाल्यावर सत्य बाहेर येईलचं, अशी भूमिका मांडली आहे.

राजीनाम्याबाबत दोन गट?
राठोड यांच्या राजीनाम्याबाबत भाजप आग्रही असताना शिवसेनेतील एका गटानेही विनाकारण होणारी पक्षाची बदनामी थांबविण्यासाठी राठोड यांचा राजीनामा घेतला जावा, अशी भूमिका मांडली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून, नंतर जे काही सत्य बाहेर येईल त्यानुसार राठोड यांच्यावर कारवाई अथवा त्यांना पुन्हा मंत्रिपदावर नेमता येईल, असे या गटाचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे पक्षातील अन्य गटाने राठोड यांचा राजीनामा घेण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही काही आरोप झाले होते, मात्र त्यांचा लगेचच राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे आपल्या मंत्र्यांचा तरी कशाला राजीनामा घ्यायचा? पोलिस तपासात जे काही सत्य बाहेर येईल त्यानुसार नंतर कारवाई करता येईल, असे या गटाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या गटाचे नेतृत्व पक्षातील एक ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्रीच करीत आहेत.

वाचाः

धनंजय मुंडेवर आरोप

काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही असेच आरोप करण्यात आले होते. त्यावेळी भाजपनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची बाजू सावरत संपूर्ण चौकशी झाल्यावरच निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली होती. शरद पवार यांनीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं तातडीने निर्णय न घेता विचार करुनच निर्णय घेण्यात येईल, असं म्हटलं होतं. पण तपासाअंती त्यात काही तथ्य आढळलेलं नाही त्यामुळंच उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा तात्काळ राजीनामा न घेण्यामागे हे एक कारण असल्याचं समजतंय.

महाविकास आघाडी सरकार आल्यापासूनच भाजपचे दुसऱ्या फळीतील नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून बेछूट आरोप करत सुटले आहेत. सुशांत प्रकरणात त्यांनी खुद्द आदित्य ठाकरे यांनाही ओढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चौकशीतून वेगळेच तथ्य समोर आले. उद्धव ठाकरे हे राठोड यांच्या बाबतीत सबुरीने पावलं उचलण्यामागे हेही एक कारण आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पूजा चव्हाण ही तरुणी टिक टॉकमुळे प्रकाशझोतात आली होती. सोशल मीडियात तिचा मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर आहे. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती परळी वैजनाथ येथून पुण्यात आली होती. पुण्यातील वानवडी भागात ती वास्तव्याला होती. तिच्यासोबत तिचा भाऊ आणि एक मित्रही होता. ८ फेब्रुवारी रोजी पूजाने इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली. तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. मात्र, गेले काही दिवस याअनुषंगाने १० ते १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यातून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ऑडिओ क्लिप’ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा करत विरोधी पक्ष भाजपने शिवसेना तसेच राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here