मुंबई: चीनमध्ये जीवघेण्या करोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा आटापिटा करत असतानाच काही भारतीयांनी मात्र भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश असून केवळ पैसे नसल्याने त्यांनी भारतात येण्यास नकार दिला आहे.

चीनच्या वुहानमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव वाढल्याने या ठिकाणी राहणाऱ्या भारतीयांना भारतात आणण्यास भारताने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी वुहानला काल एक विशेष विमानही रवाना झालं होतं. या विमानाने काही भारतीय चीनमधून परत आले. तर काहींनी पैशांची समस्या असल्याचं सांगत भारतात येण्यास नकार दिला. आम्ही अनेक रोग पाहिलेत, त्यामुळे करोनाची भीती वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यातील बहुतेकजण महाराष्ट्रातील आहेत.

वुहान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून पीएचडी करत असलेले गिरीश पाटील आणि चंद्रदीप जाधव यांनी पैशांची कमी असल्याने भारतात येण्यास नकार दिला. आम्ही कनिष्ठ मध्यमवर्गातील लोक आहोत. जर आम्ही आता परतलो तर आम्हाला आमचे पैसे भरून नंतर परत चीनमध्ये यावं लागेल. ते आम्हाला परवडणारे नसेल, असं गिरीश पाटील यांनी सांगितलं. पाटील हे धुळ्याचे रहिवासी आहेत. त्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशीपमधून ते स्वत:चा उदरनिर्वाह करतानाच कुटुंबीयांनाही थोडीफार मदत करतात. आम्ही गरीब कुटुंबातून आलो आहोत. आमच्या घरचे आमच्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे प्रवासावर आम्ही पैसा खर्च करू शकत नाही. आम्ही भारतातही अनेक भयंकर रोग पाहिलेत. त्यामुळे करोनाची आम्हाला भीती वाटत नाही, असं पाटील यांनी सांगितलं.

पाटील आणि जाधव यांच्यासह इतर सहा भारतीय विद्यार्थी विद्यापीठाच्या डोरमिट्रीमध्ये होते. त्यातील दोनजण भारतात परतले आहेत. आम्ही व्यवस्थित आहोत. दुतावासातील अधिकारी अॅपच्या माध्यमातून आमच्या संपर्कात आहेत, असंही पाटील म्हणाले. आम्ही चार तासांसाठी विद्यापीठाच्या बाहेर जाऊ शकतो. विद्यापीठाची कँटीन खुली आहे. मात्र आमचं जेवण आम्हीच बनवतो. रस्त्यावरील वर्दळ प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे भयान वाटतं. विद्यार्थ्यांना या महिन्याची स्कॉलरशीप अॅडव्हान्समध्ये देण्यात आली आहे, असं चंद्रदीप जाधव यांनी सांगितलं. जाधव आणि पाटील हे दोघेही नोव्हेंबरमध्ये मटेरियल सायन्स अँड इंजिनीयरिंगच्या शिक्षणासाठी चीनमध्ये आले होते. त्यांच्यासोबतचे अनेक विद्यार्थी करोनाच्या भीतीने मायदेशी परतले आहेत. भारतातील अनेक विद्यापीठात अर्ज बाद झाल्यानेच चीनमध्ये शिक्षणासाठी आल्याचंही या दोघांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here