नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या आहेत. देशात करोना व्हायरसचे ( ) तीन प्रकार (ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील) आढळून आले आहेत. त्यानंतर नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या तिन्ही देशांमधील करोनाच्या नव्या प्रकारांमुळे संसर्ग वाढवण्याची क्षमता अधिक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. ब्रिटनमधील व्हायरस – ८६, दक्षिण आफ्रिकेतील व्हायरस – ४४ आणि ब्राझीलमधील व्हायरसचा १५ देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना (SOP) जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील.

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी (ब्रिटन, युरोप आणि मिडल इस्ट पासून सुरू होणारी फ्लाइट वगळता) प्रक्रियेत (SOP) कोणताही बदल झालेला नाही. अशा प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलवर ७२ तासांपूर्वी घेतल्या गेलेल्या करोना चाचणीचा निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट अपलोड करावा लागेल तसेच तो सोबत आणावा लागेल. मृत्यूसारखी एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यावरच अशा प्रवाशांना चाचणी रिपोर्टची सूट दिली जाईल. हेच प्रोटोकॉल सीपोर्ट आणि लँडपोर्टवर येणार्‍या प्रवाशांनाही लागू असतील. ब्रिटन, युरोप आणि मिडल इस्टमधून येणार्‍या किंवा ट्रांझिट होणाऱ्या उड्डाणांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये गेल्या १४ दिवसांतील प्रवासाची माहिती देणं बंधनकारक असेल.

सर्व प्रवासी आपला ७२ तासांपूर्वीचा निगेट्विव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट अपलोड करतील आणि सोबतही आणतील. याशिवाय सर्व प्रवाशांना भारतीय विमानतळावर उतरल्यानंतर मॉलिक्यूलर चाचणी करणं बंधनकारक असेल आणि त्याचा खर्च प्रवाशांनाच द्यावा लागेल. अशा सर्व प्रवाशांना उड्डाणातील वेगळ्या चिन्हांकित जागेवर बसवले जाईल (मागील १४ दिवसांच्या प्रवासाच्या माहितीच्या आधारावर) ज्याने त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करणं सुलभ होईल. मॉलिक्यूलर चाचणी करणं आणि त्याचा रिपोर्ट येण्याच्या प्रक्रियेसाठी ६ ते ८ तास लागू शकतात. यामुळे भारतीय विमानतळावरील ट्रांझिट वेळेची माहिती विमान कंपनीने प्रवाशाला अगोदरच दिली पाहिजे.

ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना मॉलिक्यूलर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर भारतीय विमानतळावरून कनेक्टिंग उड्डाण घेण्याची परवानगी देण्यात येईल. अशा प्रवाशांना घरात ७ दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला जाईल. ७ दिवसानंतर अशा प्रवाशांची पुन्हा चाचणी केली जाईल आणि त्यांचा रिपोर्ट निगेट्विव्ह असल्यास त्यांना क्वारंटाइनमधून सोडण्यात येईल. पण पुढील ७ दिवस त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावं लागेल. भारतीय विमानतळांवर सध्या असलेल्या ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका येथील प्रवासी आपले नमुने देऊन विमानतळ सोडू शकतात. पण राज्याचे प्रशासन किंवा एजन्सी त्यांच्या संपर्कात असेल. राज्याचे प्रशासन अशा प्रवाशांचे रिपोर्ट एकत्रित करून त्यांना माहिती देईल.

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हे प्रवासी ७ दिवस होम क्वॉरंटाइन राहतील आणि राज्य प्रशासन त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवेल. ७ दिवसानंतर अशा प्रवाशांची पुन्हा चाचणी केली जाईल आणि ती निगेटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाइनमधून सोडले जाईल. मात्र आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमधून येणारे प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास विमानतळावर किंवा होम कॉरेंटिनमध्ये किंवा त्यांच्या संपर्क येणारे पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना इन्स्टिट्युशनल आयसोलेशनमध्ये वेगळे ठेवले जाईल. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here