म. टा. वृत्तसेवा, मंदिराचा प्रसाद व आइस्क्रीममध्ये गुंगीचे औषध टाकून एका रिक्षाचालकाची २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी लुटल्याचा प्रकार कल्याणमध्ये नुकताच घडला. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

पश्चिमेकडील संजय तायडे हे रिक्षाचालक दुपारच्या सुमारास महात्मा फुले रिक्षा स्टॅण्डवर उभे होते. यावेळी तेथे आलेल्या दोघांनी शहाड येथील बिर्ला मंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याचे सांगितले. तायडे या दोघांना घेऊन बिर्ला मंदिरापर्यंत गेले. काही वेळाने परत आलेल्या या दोघांनी तायडे यांना मंदिरातील प्रसाद म्हणून पेढे खायला दिले. मात्र या पेढ्यात त्यांनी गुंगीचे औषध टाकले होते. तायडे यांच्यावर या औषधाचा काहीच परिणाम न झाल्याचे लक्षात आल्यानंतर या भामट्यांनी तायडे यांना अन्य मार्गाने रिक्षा नेण्यास सांगितली व त्यांना प्रेम ऑटो येथे आणले.

या ठिकाणी या दोघांनी तायडे यांना आइस्क्रीम खाण्याचा आग्रह केला. ते आइस्क्रीम खाण्यास तयार होताच हातचलाखीने त्यांनी त्यांच्या आइस्क्रीममध्ये गुंगीचे औषध टाकले. हे आइस्क्रीम खाताच तायडे बेशुद्ध झाले. यानंतर या चोरट्यांनी तायडे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तसेच त्यांच्या शर्टच्या खिशातील दोन हजार रुपयांची रोकड चोरली व तेथून पलायन केले. शुद्धीवर आल्यानंतर तायडे यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here