म. टा. प्रतिनिधी, : अमरावती येथून झालेल्या चार वर्षांच्या बालकाची नगरमध्ये सुखरूप सुटका करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. या मुलाच्या सावत्र आजीनेच नगरमधील आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला होता. पोलिसांनी आतापर्यंत एका महिलेसह पाच आरोपींना अटक केली आहे. आपले जुने देणे चुकवण्यासाठी बालकाचे अपहरण करून लुणिया यांच्याकडे खंडणी मागण्याचा आरोपींचा कट होता. मात्र,अमरावती आणि नगरच्या पोलिसांनी तातडीने हालचाली केल्याने तो कट उधळला गेला.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, नयन मुकेश लुणिया (वय ४, रा. अमरावती) याचे १७ फेब्रुवारीला अपहरण झाले होते. अमरावतीच्या पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या अधारे आरोपी नगरला आल्याची माहिती मिळाली. नगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, गणेश इंगळे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीप पवार, सागर ससाणे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. त्यांनी काही तासांतच हिना शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे, अल्मश ताहेर शेख, असिफ हिमायत शेख, मुजाही नासीर शेख व फैरोज नसीर शेख (रा. नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नयनची सुखरूप सुटका करण्यात आली. आणखी एका महिलेसह चार आरोपी फरारी आहेत.

पोलिसांना प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, यातील हिना शेख उर्फ हिना देशपांडे या महिलेने पैशांसाठी हे अपहरण घडवून आणले आहे. यातील आरोपी हिना हिचे अमरावतीला लुणिया यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तिला माहिती होती. नगरमध्ये एका मैत्रिणीकडून घेतलेले कर्ज चुकते करण्यासाठी तिला पैशांची गरज होती. ते पैसे मिळविण्यासाठी अन्य आरोपींच्या मदतीने नयनच्या अपहरणाची योजना आखण्यात आली. १७ तारखेला नयन याला घरातून बाहेर आणून दुचाकीवरून काही अंतर नेण्यात आले. त्यानंतर नगरला आणण्यात आले. पुढे त्याला कल्याण येथे घेऊ जाऊन तेथून लुणिया यांच्याकडे खंडणी मागण्याची आरोपींची योजना होती. मात्र, अमरावती पोलिसांनी तक्रार येताच हालचाली सुरू केल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नगर पोलिसांशी संपर्क साधला. नगरच्या पोलिसांनीही तेवढ्याच गतीने हाचाली केल्याने अशा गुन्ह्यांत सराईत असलेले आरोपी पोलिसांच्या हाती लागले आणि नयनची सुटका झाली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here