छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना नवी मुंबईत सत्ता परिवर्तन एक हजार एक टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. साताऱ्यात भर पावसात झालेल्या शरद पवार यांच्या सभेचा दाखला देत नवी मुंबईचा पुढचा महापौर महाविकास आघाडीचाच असेल, असेही सुप्रिया म्हणाल्या. भाजपच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रात आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि राष्ट्रवादीकडून केलेलं इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा दावा करत सुप्रिया यांनी यावेळी जोरदार टोलेबाजी केली.
वाचा:
देवेंद्र फडणवीस यांच्यावर यावेळी जोरदार शब्दांत त्यांनी निशाणा साधला. ‘पवार साहेबांनी आता निवृत्त व्हावं, असं मार्गदर्शन फडणवीसांनी केलं होतं. मात्र, महाराष्ट्राला ते मान्य नव्हतं. त्यामुळेच ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा! महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस दूसरी तरफ’, असे चित्र महाराष्ट्रात दिसले अशी टोलेबाजी सुप्रिया यांनी केली. फडणवीस म्हणतात म्हणून पवारसाहेब निवृत्त होतो असे म्हणतीलही पण महाराष्ट्राच्या मनात तसं नाहीय, असेही त्यांनी नमूद केले. नवी मुंबईकरांच्या मनात ‘त्या’ घोड्याची फिल्म छान झालीय. म्हणूनच ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ असे माझे म्हणणे आहे. आपल्याला तो पिक्चर बघायचा आहे, असे सूचक विधानही सुप्रिया यांनी केले.
वाचा:
दीड वर्षांपूर्वी पक्षात कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही, अशी परिस्थिती होती. रोज उठलं की आज कोण पक्षातून गेला हे तपासायचो. आज कुणीच पक्ष सोडून गेला नाही असे कळले की बरे वाटायचे, अशी आठवण सांगतानाच ५२ जण शरद पवारांना सोडून गेले होते, पण त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असे म्हणत सुप्रिया यांनी पक्षांतर करणाऱ्यांना फैलावर घेतले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते २०१९ मध्ये भाजपचं झालं. त्यातून शिवसेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आले. ‘दाल मे काला है इधरसे निकलो’. मग यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. सव्वा वर्ष भक्कमपणे आमचे सरकार काम करत आहे. केंद्र सरकारमधूनही कुणीच सव्वा वर्षात टीका करू शकले नाही. येथले त्यांचे नेते टीका करतात त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी उत्तर देत आहे. म्हणूनच प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे, असेही सुप्रिया म्हणाल्या. या मेळाव्याला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times