खराडी बायपास चौकात उभ्या केलेल्या कारमधून ५१ हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोपट ढवळे (वय ५४, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी बायपास येथील प्रशांत टायर्स दुकानासमोर ढवळे यांनी गुरुवारी त्याची कार पार्क केली होती. ते मित्रासह शेजारीच असलेल्या गुरुदत्त व्हेज येथे बसले होते. ढवळे यांच्या मोटारीचा चालक आत होता; तरीही त्याची नजर चुकवून चोरट्यांनी ५० हजार रुपये रोख, जमिनीची कागदपत्रे, बँकेचे चेकबुक, पासबुक असा ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे.
विटकर टोळी तडीपार
चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विटकर टोळीच्या चार जणांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. झोन चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी हा आदेश दिला.
अजय चंद्रकांत विटकर (वय १९, रा. जुनी वडारवाडी), प्रथम उर्फ आकाश तुळशीदास विटकर (१९, रा. वडारवाडी), गणेस कोकणे (१९) आणि प्रफुल गायकवाड (१९, दोघेही रा. मंजाळकर चौक, जुनी वडारवाडी) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. अजय विटकर हा टोळीप्रमुख असून, या टोळीतील आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदा जमाव करणे, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींविरोधात चतुःश्रृंगी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला झोन चारच्या उपायुक्तांनी परवानगी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times