मणी यावेळी म्हणाला की, ” जागतिक क्रिकेटमध्ये फक्त तीन शक्तीशाली देशांचीच सत्ता आहे, पण ही मानसीकता बदलणे आता गरजेचे आहे. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषक आता भारतामध्ये होणार आहे. त्यामुळे संघाबरोबर चाहते आणि पत्रकारांना भारताने व्हिसा द्यायला हवा. पण जर भारत व्हिसा देण्याचे लिखीत आश्वासन देत नसेल तर ही स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी खेळवायला हवी, असे मला वाटते. कारण व्हिसाची हमी आम्ही हवी आहे. ती जर मिळत नसेल तर या स्पर्धेत आम्ही कसे सहभागी होऊ शकतो. त्यामुळे भारताने आम्हाला व्हिसाची लिखीत हमी द्यावी नाहीतर ही स्पर्धा दुसऱ्या ठीकाणी खेळवण्यात यावी.”
मणी यांनी पुढे सांगितले की, ” आम्ही आयसीसीकडे याबाबत एक मागणी केली आहे. आम्हाला मार्च महिन्यापर्यंत व्हिसासाठी लिखीत आश्वासन मिळायला हवे. पण जर तसे होत नसेल तर काय करायचे, याचा विचार आम्हालाही करावा लागेल. जर आम्हाला व्हिसासाठी लिखीत हमी मिळाली नाही, तर हा विश्वचषक भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात यावा, ही आमची मागणी कायम राहणार आहे.”
भारतामध्ये एप्रिलमध्ये आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. या विश्वचषकाच्यावेळी पाकिस्तानच्या संघाची पूर्ण सुरक्षेची हमी बीसीसीआयने घ्यायला हवी, त्याचबरोबर याबाबतचे लिखीत आश्वासन त्यांनी आम्हाला द्यायला हवे, असेही मणी यांनी यावेळी सांगितले आहे. पाकिस्तानच्या संघाला भारतामध्ये प्रवेश द्यायचा की नाही, हा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागणार आहे. केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्यावरच बीसीसीआय आपले मत व्यक्त करु शकते. त्यामुळे आता केंद्र सरकार या विषयावर कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times