भारतीय संघ सध्या अहमदाबादच्या मोटेरा मैदानात सराव करणार असला तरी वेगवान गोलंदाज उमेश यादव अजून फिट आहे की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी उमेशला संघात स्थान देण्यात आले आहे. पण हा सामना खेळण्यासाठी उमेशला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेशची फिटनेस टेस्ट रविवारी होणार आहे. या टेस्टमध्ये जर उमेश पास झाला तरच त्याला तिसरा कसोटी सामना खेळता येणार आहे. पण तो जर या टेस्टमध्ये नापास झाला तर त्याला हा सामना खेळता येणार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात उमेशला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून तो सावरला आहे. पण तो सामना खेळण्यासाठी फिट आहे की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा असताना त्यांना एक मोठा धक्का बसला होता. भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला तिसऱ्या दिवशी दुखापत झाली होती आणि त्याने मैदान सोडले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात उमेशने जो बर्न्सची विकेट घेत संघाला पहिले यश मिळून दिले होते. त्यांनतर उमेशला एकही सामना खेळता आलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाला आता कोणत्याही खेळाडूबाबतीत जोखीम उचलायची नाही आहे. त्यामुळेच उमेश जर फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्याचा विचार तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी करण्यात येऊ शकतो.
ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळत असताना उमेशला दुखापत झाल्याने वैद्यकीय पथक मैदानावर आले होते. पण थोड्यावेळातच उमेश लंगडत ड्रेसिंग रुममध्ये गेला होती. त्याची शिल्लक ओव्हर मोहम्मद सिराजने पूर्ण केली होती. मालिकेच्या आधी भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे बाहेर झाला होता. तर पहिल्या कसोटीत चेंडू लागल्याने जलद गोलंदाज मोहम्मद शमी उर्वरीत मालिकेतून बाहेर पडला होता. आता हे तिन्ही गोलंदाज दुखापतीमधून सावरलेले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times