गेल्यावर्षी आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव हा भन्नाट फॉर्मात होता. त्याची भारतीय संघात निवड होईल, असे सर्वांना वाटले होते. पण त्यावेळी सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते आणि त्यानंत सोशल मीडियावर चांगलाच राडा झाला होता. चाहत्यांनी यावेळी कर्णधार विराट कोहलीला चांगलेच ट्रोल केले होते. त्याचबरोबर सूर्यकुमारसाठी चाहत्यांच्या मनात चांगलीच सहानुभुती होती.
आयपीएलच्या एका सामन्यात तर कोहलीने सूर्यकुमारला नजरेने चांगलाच राग दिल्याचेही पाहिले गेले होते. त्यानंतर चाहते कोहलीवर चांगलेच भडकले होते. त्याच सामन्यात धडाकेबाज खेळी साकारत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आता कोहलीच्या नाकावर टिचून सूर्यकुमार संघात आला, असे चाहते म्हणत आहेत.
यावेळी रोहित शर्मालाही संघात स्थान न दिल्यामुळे सोशल मीडियावर चांगलच राडा झाला होता. सोशल मीडियावर कोहली, रवी शास्त्री आणि निवड समितीला चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. ज्या दिवशी रोहित हा दुखापतग्रस्त असल्याचे सांगण्यात आले होते. त्यादिवशीच रोहित मुंबई इंडियन्ससाठी सराव करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे आपण फिट असल्याचे रोहितने आपल्या फक्त एका कृतीतून दाखवून दिले होते. त्यावेळी संघात फूट पडल्याचेही म्हटले जात होते.
भारतीय संघात यावेळी मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर राहुल तेवातियासारख्या मेहनती खेळाडूचीही यावेळी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी संघातील बदल बरंच काही सांगू जाणारे आहेत. कारण यापूर्वी कोहली आणि सूर्यकुमार वेगवेगळ्या संघात आयपीेलमध्ये खेळले होते. पण पहिल्यांदाच आता ते एकाच संघातून खेळणाताना दिसणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times