म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासनानं कठोर पावलं उचलत मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात रात्री ११ ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच, शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे. तसंच, खासगी कोचिंग क्लासला दिलेली परवानगी रद्द केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असलेल्या अभ्यासिका या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.

वाचाः

हॉटेल तसेच इतर आस्थापनांना रात्री उशिरापर्यंत दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली असून हॉटेल आणि बार रात्री ११ वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लग्न समारंभ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आणण्यात आले आहेत. कार्यक्रमांसाठी २०० जणांना परवानगी देण्यात आली असून त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसंच, सिंगल विंडोज सिस्टीमही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

पुण्यात संचारबंदीचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी जिल्ह्यांतर्गंत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. भाजीपाला आणि अन्य वस्तू वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात सोमवारी व्यापारी वर्गासोबत बैठक घेण्यात येणार आहे.

वाचाः

लसीकरणावर भर

पुण्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना इतर उपाययोजनांबरोबर प्रशासनानं करोना प्रतिबंधक लसीकरणावरही भर दिला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच, करोनाच्या चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. कोविड केअर सेंटर येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे तर, आवश्यकता भासल्यास जम्बो सेंटरही सुरू केले जाणार. सध्या दररोज दहा हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये आणखी एक हजार चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. बीजे मेडिकल कॉलेजमध्ये या चाचण्या केल्या जातील.

कंटेनमेंट झोन वाढवणार

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॉटस्पॉट हे प्रतिबंधित क्षेत्र करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पवार यांनी केले. ताप आलेल्या रुग्णांची खासगी रुग्णालयांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.
सुपर स्प्रेडर आणि सारी रुग्णांचे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here