मुंबई– गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी चाहत्यांना आनंदाच्या बातम्या दिल्या. काही कलाकार लग्नबंधनात अडकले तर काहींच्या घरात पाळणा हलला. आता मराठी सिनेसृष्टीतूनही आनंदाची बातमी आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता शशांक केतकरने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. शशांक बाबा झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नुकतीचं बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला पुत्ररत्नाचा लाभ झाल्याची बातमी चाहत्यांना समजली होती. त्यात शशांकने तो बाबा झाल्याची बातमी दिल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असणाऱ्या याच्या घरात एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. शशांकची पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे. त्याने त्यासोबत एक फोटो शेअर करत त्यावर बाळाचं नावदेखील लिहीलं आहे. शशांकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने मुलाला कुशीत घेतले आहे. बाळाचा चेहरा दिसत नाहीये परंतु, त्याने त्याच्या बाळाचं नामकरण करून त्यावर ऋग्वेद शशांक केतकर असं लिहीलं आहे.

शशांकने यापूर्वी २५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात प्रियांका गरोदर असल्याचं दिसत होतं. या पोस्टमध्ये त्याने हे वर्ष आमच्यासाठी सुखद जाणार आहे, या वर्षी अनेक भेटवस्तू मिळणार आहेत, त्यातली एक आम्हाला अगोदरचं मिळाली आहे, असं म्हटलं होतं. शशांकचा हा फोटो म्हणजे चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता. त्यानंतर शशांकवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.

शशांक हा ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचला होता. त्या मालिकेतील त्याची श्री ची भूमिका आजवर प्रेक्षकांच्या मनात आहे. तेव्हा त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर शशांक ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा…’ या मालिकांमध्ये दिसला होता. याशिवाय ‘३१ दिवस’, ‘आरॉन’, ‘वन वे तिकीट’ या चित्रपटात देखील तो झळकला होता. आता शशांकची ‘पाहीले न मी तुला’ ही मालिका झी मराठीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here