जयपूर: आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी तस्करीसंबंधी प्रकरण उघडकीस आले. येथे शारजाहून विमानाने आलेल्या तरुणाला पोलिसांनी प्रकरणात अटक केली आहे. तरुणाने बुटांमध्ये १४९५ ग्रॅम सोने लपवून आणले होते. तो विमानतळावर आल्यानंतर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
कस्टम अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शारजाहून विमानाने जयपूरला आलेल्या श्रवणकुमारला अटक केली आहे. त्याने आपल्या बुटांमध्ये सोन्याची बिस्कीटे लपवून आणली होती. आरोपी हा सीकरचा रहिवासी आहे. शारजात तो एका कंपनीत नोकरी करतो. तरुणाला सोने नेमके कोणी दिले, ते कुठून आणले गेले आहे, याची माहिती नाही. त्याची चौकशी केली जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालसेपोटी त्याने शारजा येथून जयपूरला ही सोन्याची बिस्कीटे आणली होती. त्याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तरुणाने नेमके कोणत्या कारणामुळे हे सोने तस्करीसाठी जयपूरला आणले आहे, हे स्पष्ट होईल. जप्त केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे ७० लाख रुपये आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times