सरकारची चिंता वाढली
देशातील अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये केरळ आणि महाराष्ट्रात ७४ टक्क्यांहून अधिक रुग्णांचा समावेश आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्येही दररोज नवीन रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये करोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. ग्रामीण भागात वाढत्या संक्रमणामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
केंद्र सरकारने या राज्यांना आरटी-पीसीआर चाचण्यांच्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासह आरोग्य मंत्रालयाने सर्व निगेटिव्ह रॅपिड टेस्ट रिपोर्ट आलेल्यांची आरटी-पीसीआर टेस्ट घेण्याचे निर्देश दिले आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये वेगाने वाढ
देशात करोना व्हायरसच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे २५०७ अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची टक्केवारी १.३२ पर्यंत गेली आहे. देशात गेल्या २४ तासांत ११,६६७ जण करोनातून बरे झाले आहेत. यामुळे करोनातून बरे होण्याचा दर ९७.२५ टक्क्यावर आहे. भारतातील करोनाचा मृत्यूदर सध्या १.४२ टक्के इतका आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेशासाठी निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक
कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांसाठी आरटी-पीसीआर अहवाल बंधनकारक केला आहे. करोनाचा चाचणीचा रिपोर्ट हा ७२ तासांपेक्षा अधिक जुना नसावा, असं कर्नाटक सरकारने शनिवारी स्पष्ट केलं.
देशात आतापर्यंत एकूण १.०९ कोटी रुग्ण
देशात आतापर्यंत करोना व्हायरसचे एकूण १ कोटी ९ लाख ९१ हजार ६५१ रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ कोटी ६ लाख ८९ हजार ७१५ जण बरे झाले आहेत. देशात करोना व्हायरसच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १ लाख ४५ हजार ६३४ इतकी झाली आहे. आतापर्यंत भारतात करोनाने एकूण १ लाख ५६ हजार ३०२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times