म्यानमारच्या लष्कराने एक फेब्रुवारी रोजी लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथवून टाकत सत्ता काबीज केली. त्यानंतर आंग सान स्यू की यांना अटक करण्यात आली. त्यानंतर देशभरात आंदोलन सुरू असून लष्करशाही विरोधात असंतोषाची लाट पसरली आहे. आंदोलन चिरडण्यासाठी लष्करशाहीने सोशल मीडियावर बंदीसह इतर उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. मात्र, आंदोलन आणखीच तीव्र होत आहे.
वााचा:
वाचा:
मंडालेमध्ये शनिवारी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणखी दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. यातील एकाच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीच्या छातीत गोळी लागली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘फ्रंटियर म्यानमार’ या यांगूनस्थित वृत्तपत्राने दिले आहे. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्तात म्हटले आहे. ‘इरावद्दी’ या वेबसाइटनेही दोघांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
वाचा:
मंडाले शहरात वैद्यकीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शनिवारी आंदोलन पुकारले होते. त्यात सुमारे १००० जण सहभागी झाले. यांगूनमध्ये गुरुवारी पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेली तरुणी म्या थ्वेट थ्वेट खाइन हिचा फोटो या आंदोलकांनी हाती धरला होता. अनेकांनी सविनय कायदेभंग आंदोलनाचा संदर्भ देणारे ‘सीडीएम’ असे लिहिलेले फलक हाती धरले होते. या आंदोलनाने प्रेरित होऊन अनेक डॉक्टर, इंजिनीअर लष्कराविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
वाचा:
लष्कराच्या गोळीबारात मरण पावलेली म्या थ्वेट थ्वेट खाइन या तरुणीला यांगून आणि मंडालेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. यांगूनमधील रस्त्यावर उत्स्फूर्तपणे जमलेल्या एक हजार आंदोलकांनी तिला श्रद्धांजली वाहिली. खाइन हिच्या विसाव्या वाढदिवसाच्या काहीच दिवस आधी तिचा मृत्यू झाला. या श्रद्धांजलीदरम्यान ‘म्यानमारमधील हुकूमशाही संपवा’ असे फलक आंदोलनकर्त्यांनी हातात घेतले होते. शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर लष्कराकडून झालेल्या हिंसेत झालेल्या मृत्यूप्रकरणी अमेरिकेचे नेड प्राइस यांनी सरकारतर्फे शोक व्यक्त केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times