राज्यातील लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.
‘अधिवेशनाच्या काळात तुम्हाला लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत म्हणून लॉकडाऊनची धमकी देणार का?, इतके दिवस रुग्ण वाढले नाहीत आत्ताच कसे रुग्ण वाढले?, ही सर्व सरकारची नाटकं चालली आहे,’ अशा शब्दांत देशपांडे यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. शिवाय, ‘चाचण्या वाढवल्यामुळं रुग्ण वाढले आहेत, मागील काळात चाचण्या कमी झाल्यानं रुग्ण कमी होते. ही फक्त वातावरण निर्मिती सुरु आहे,’ अशा शब्दांत देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे.
वाचाः
‘अधिवेशन घ्यायचं नाही म्हणून कुठेतरी अमरावतीत करोनाच्या जास्त चाचण्या घ्यायच्या आणि करोना वाढल्याचं सांगायचे. गेल्या चार महिन्यात राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पेट्रोल दरवाढीवर आंदोलन झालं तेव्हा करोना पसरला नाही. बसमध्ये लोक प्रवासी करतात. तेव्हा करोना कसा काय झाला नाही. अधिवेशनाच्याच काळात करोनाचा संसर्ग कसा वाढला,’ अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
वाचाः
‘सावधान सध्या करोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. टीप-ह्या नंतर अनेक माविआ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times