कोल्हापूर: महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या टेस्टशिवाय कर्नाटकात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारचे हे धोरण कायम राहिल्यास कर्नाटकातील लोकांनाही महाराष्ट्रात येण्यास बंदी घालण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री व गृहराज्यमंत्री यांनी आज दिला. दरम्यान, याबाबत बेळगावच्या पालकमंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याचे आरोग्य राज्यमंत्री यांनी सांगितले. ( Latest News )

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रत्येकाची कोगनोळी टोल नाक्यावर तपासणी सुरू आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही. यामुळे नाक्यावर मोठी गर्दी होत असून वादावादी सुरू झाली आहे. ही बंदी चुकीची असून याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, विना मास्क असणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल यंत्रणेने कारवाई करावी. विना मास्क असणाऱ्यांना दुकानदारांनी प्रवेश देऊ नये. प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावर भर द्यावा. ज्या अधिकारी-कर्मचारी यांची नोंदणी लसीकरणासाठी झालेली आहे, त्यांचे लसीकरण शुक्रवारपर्यंत होण्याची जबाबदारी त्या-त्या विभाग प्रमुखांवर आहे, असे निर्देशही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, विदर्भात रुग्णसंख्या वाढते आहे. पूर्वतयारी म्हणून आपल्यालाही सतर्क रहावे लागेल. उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्री यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक तालुक्यात एक कोव्हिड केअर सेंटर सुरू करता येईल याबाबत तयारी ठेवावी. पुन्हा एकदा सर्व्हेक्षणावर भर द्यावा. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवण्यावरही भर हवा. प्रमुख शहरातील खासगी लॅबवर लक्ष देणं आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या लॅबला भेटी द्याव्यात. आतापर्यंत सर्वांनी मिळून चांगले काम केले आहे, यापुढेही करूया, त्यासाठी सर्वांनी दक्षता बाळगूया, असेही ते म्हणाले.

विना मास्क असणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल यंत्रणेने कारवाई करावी. विना मास्क असणाऱ्यांना दुकानदारांनी प्रवेश देऊ नये. आपण सर्वांनीही मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचा वापर करावा. स्वत:हून लोकांनी उपाययोजना करावी, नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

तालुकास्तरावर सीसीसीची तयारी ठेवावी: यड्रावकर

विदर्भातील वाढती रुग्णसंख्या पाहून जिल्ह्यातील करोना प्रतिबंधात्मक उपाय आणि नियोजनासाठी तालुका स्तरावर कोविड केअर सेंटरची तयारी ठेवण्याची सूचना दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यस्तरावर आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आपली आणि आपल्या कुटुंबियांची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here