अहमदाबाद : भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्यानंतर भारतीय संघाकडून शंभर कसोटी सामने खेळणारा इशांत शर्मा हा पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे. पण त्याचवेळी इशांतने एक मोठा खुलासा केल्याचेही पाहायला मिळाले आहे.

आतापर्यंत भारताच्या फार कमी वेगवान गोलंदाजांना १०० कसोटी सामने खेळता आले आहेत. त्यामध्ये आता इशांतही सामील होऊ शकतो. कारण आता इशांत हा शंभरव्या कसोटी सामन्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे एवढे कसोटी सामने आपल्याला कसे खेळायला मिळाले, याचा खुलासा आता इशांतने केला आहे.

इशांतने वयाच्या १८व्या वर्षी भारताकडून पदार्पण केले होते. त्यावेळी राहुल द्रविड हा भारताचा कर्णधार होता. त्यानंतर अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली तो खेळला आहे. यावेळी कोणता कर्णधार तुला चांगल्यापद्धतीने समजू शकला, असा प्रश्न इशांतला विचारला होता. त्यावर इशांत म्हणाला की, ” हे सांगणं खरंच कठीण आहे. कारण सर्वच कर्णधार मला चांगलेच ओळखत चहोते. कर्णधार मला किती समजतात त्यापेक्षा मी त्यांना किती समजून घेतो, हे सर्वात महत्वाचे आहे. कर्णधाराला माझ्याकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. ही गोष्ट जर तुम्हाला समजली तर कर्णधाराबरोबरचा तुमचा संवाद सोपा होऊ शकतो.”

कपिल देव यांचा १३१ कसोटी सामन्यांचा विक्रम आहे, तो तु कधी मोडणार, असे इशांतला यावेळी विचारण्यात आले होते. त्यावर इशांत म्हणाला की, ” या गोष्टीला थोडा वेळ लागेल, असे मला वाटते. पण मी या गोष्टीचा सध्या विचार करत नाही. मी विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा विचार करतो आहे. कारण माझ्यासाठी तरी हा विश्वचषक आहे. कारण ही स्पर्धा जिंकल्यावर विश्वचषक जिंकल्याचा आनंद मला होईल. मला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळायचे नाही, असं काही नाही. पण जर मी मर्यादीत षटकांचेही सामने खेळलो असतो तर कदाचित १०० कसोटी सामने पूर्ण करण्यासाठी मला अजून बराच कालावधी लागू शकला असता.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here