नवी दिल्लीः आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांच्या लसीकरणाच्या ( ) गतीनंतर आता सरकार ५० वर्षांवरील आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या २७ कोटी नागरिकांना करोना लस देण्याची तयारी करत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा ( ) यांनी आतापर्यंत झालेले लसीकरण आणि पुढील तयारीचा आढावा घेतला. शहा यांनी लसीची उपलब्धता आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या लसीकरण मोहिमेसाठी को-विन प्लॅटफॉर्मच्या तयारीवरून समाधान व्यक्त केले. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित पावलं उचलण्याच्या ( ) सूचना त्यांनी दिल्या.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत बैठकीला करोना लसीकरणाशी संबंधित सर्व महत्वपूर्ण अधिकारी उपस्थित होते. यामध्ये पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि गृहसचिव अजय भल्ला यांचा समावेश आहे. नीती आयोगाचे सदस्य आणि लसीवरील उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. व्हीके पॉल यांनी २७ कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी लसीची गरज व उपलब्धता याविषयी सविस्तर सादरीकरण केले, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

को-विन प्लॅटफॉर्म एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवण्यास कसे तयार आहे, याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख आरएस शर्मा यांनी दिली. को-विन प्लॅटफॉर्म केवळ लस उत्पादनापासून ते लाभार्थीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवत नाही तर लाभार्थ्यांची नोंदणी आणि लसीकरण आणि दुसऱ्या डोससाठी एसएमएस पाठवण्याचे कामही करते, असं शर्मा म्हणाले.

करोनावरील लसीकरणाच्या सुरुवातीच्या अडचणीनंतर को-विन प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी तयार आहे, असं आर. एस. शर्मा यांनी सांगितलं. राज्यांच्या सहकार्याने नागरिकांची नोंदणी आणि मतदार यादीनुसार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची तयारी असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. दररोज अधिकाधिक नागरिकांना लस देता येईल यासाठी लसीकरण करण्याच्या जागेची संख्या वाढवण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांची माहितीही त्यांनी दिली.

सुरवातीच्या दिरंगाईनंतर लसीकरण करणार्‍यांची संख्या वाढली आहे, असं एम्सचे संचालक डॉ. रणवीर गुलेरिया आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले. लसीचा पहिला डोस ६४.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. ही संख्या एकूण नोंदणीकृत आरोग्य कर्मचार्‍यांपैकी ६७ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी ११.१५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. लसचा पहिला डोस ३८.८३ लाख फ्रंटलाइन कामगारांना देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड लखांवर

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये करोनाची दुसरी लाट आल्याची शंका व्यक्त केली जातेय. गेल्या काही दिवसांपासून रोज १४ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड लाखांवर गेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here