म. टा. प्रतिनिधी, : एका घरात घुसलेल्या चार चोरट्यांपैकी दोघांना बापलेकांनी पाठलाग करून पकडले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनीही चोरट्यांना चांगलाच चोप दिला. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. शिवाजीनगरमधील हुडको परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

कुटुंबीय घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत झोपलेले होते. त्याचवेळी चोरट्यांनी कडीकोयंडा आणि कुलूप तोडला आणि घरात घुसले. कुटुंबीयांना जाग आली. बापलेकाने चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. पाठलाग करून दोन चोरट्यांना पकडले. मात्र, उर्वरित दोघे चोरटे पळून गेले. किरण अनिल बाविस्कर व सिद्धार्थ राजू तायडे (रा. गेंदालाल मिल) अशी पकडलेल्या दोघा संशयित चोरट्यांची नावे आहेत. त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अडीच वाजताच्या सुमारास हा थरार घडला.

शिवाजीनगर हुडकोत मेहमूदखान चॉंदखान पठाण (वय ५२) यांचे दुमजली घर असून, ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. २१ तारखेला रात्री साडेअकरा वाजता जेवणानंतर सर्व कुटुंबीय दुसर्‍या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. मेहमूदखान यांचा मुलगा नदीम हा छतावर झोपण्यासाठी गेला होता. मध्यरात्री चोरट्यांनी खालच्या मजल्यावरील खोलीचे कुलूप-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी बॅटरीच्या प्रकाशात शोधाशोध सुरू केली. कपाट, किचनमधील डबे उघडून बघत होते. त्यावेळी छतावर झोपलेल्या नदीम याला खालच्या खोलीतून काही तरी आवाज आला.

घरात चोरटे शिरले असल्याची त्याची पूर्ण खात्री झाली. यानंतर त्याने सतर्कता राखून दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या वडिलांना मोबाइलवर फोन केला. हळू आवाजातच त्यांना घरात चोरटे शिरल्याचे सांगितले. यानंतर ते दोघे खाली आले. दोन चोरटे पायऱ्यांवर बसलेले होते. मेहमूदखान यांना पाहताच चारही चोरट्यांनी खान यांच्या घरातून पळ काढला. यावेळी खान पिता-पुत्रांनी क्षणाचाही विलंब न करता थेट चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. पळताना चारपैकी दोघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. तर दोघे त्याच्या हाती लागले. पाठलाग करित असताना खान पिता-पुत्रांनी आरोळ्या मारुन परिसरातील नागरिकांना देखील जागे केले होते. त्यामुळे चोरटे हाती लागताच काही नागरिक त्यांच्या मदतीला पोहोचले. या दोन्ही चोरट्यांना नागरिकांनी चोप देऊन शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी मेहमूद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here