आमदार प्रसाद लाड यांनी एकावर एक ट्विट करत पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते ट्विटमध्ये म्हणतात, “संजय राठोड यांचे स्पष्टीकरण नसून थोतांड आहे. ज्या पक्षाचे ते मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल ही अपेक्षा ठेवावी तरी कशी? जर संजय राठोड निर्दोष असतील तर त्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जावे’
आणखी एका ट्विटमध्ये ते लिहितात, ‘बीडच्या पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणात संशयित असलेल्या संजय राठोड यांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी सीबीआय चौकशीचे आदेश त्वरित देऊन न्याय करावा. हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती.’
मंत्रीपदाचा गैरवापर आपल्या समाजातील लोकांना आकर्षित करणे, फसवणे हा संजय राठोड यांनी स्वतःचा धंदा बनवून ठेवला आहे, अशी थेट टीकाही लाड यांनी केली आहे. जनतेला सर्व काही समजत आहे असे सांगत तुम्ही जर गुन्हा केला नव्हता तर १५ दिवस बिळात लपून का बसला होता?, असा प्रश्नही त्यांनी जनतेच्या आणि स्वत:च्या वतीने विचारला आहे. त्यामुळे बिळातून बाहेर आलेला हा जो नागोबा आहे, या नागोबाचं डोकं ठेचल्याशिवाय भाजपा गप्प बसणार नाही, असा इशाराही आमदार लाड यांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
माझा मंत्री हा धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी ही चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी माझी आणि महाराष्ट्रातील जनतेची स्पष्ट मागणी असल्याचे लाड यांनी म्हटले आहे. मंत्री म्हणून मिरवणाऱ्या संजय राठोड यांचा प्रथम राजीनामा घ्यावा आणि नि:पक्षपाती चौकशी करावी, सीबीआय चौकशीतून सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
आज प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना, चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, असे वनमंत्री राठोड वारंवार सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे असेही ते सांगत होते. मात्र आज ज्या पद्धतीने त्यांनी शक्तीप्रदर्शन करून पोहरा देवीचं दर्शन घेतले, त्या पद्धतीने निपक्षपाती नक्कीच चौकशी होणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, ही विनंती, असे लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times