मुंबईः ‘पुदुच्चेरीत सरकार पाडण्यासाठी ज्या खटपटी झाल्या ते सर्व प्रयोग महाराष्ट्रात झाले. पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सामी सरकारला धड काम करु दिले नाही, दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असे वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुदुच्चेरीचे त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे. ( vs governor)

पुदुच्चेरीत काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रातही ठाकरे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. पुदुच्चेरीतील राजकीय घडामोडींवरुन शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून व राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

वाचाः

‘पुदुच्चेरी हे राज्य केंद्रशासित असल्याने तेथील राज्यपालांना जरा जास्तच अधिकार असतात. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला लोकहिताचा प्रत्येक निर्णय किरण बेदी फिरवू लागल्या. अर्थात दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असं वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुदुच्चेरीचे त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात. राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांना ही कढीपत्त्याप्रमाणे वापरुन फेकून दिले आहे हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या भाज्यपालांनी समजून घेतलं पाहिजे,’ असं म्हणत शिवसेनेनं राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

‘पद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ ला सुरुवात करू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडले तेव्हाही ‘पुढचा घाव महाराष्ट्रावर’ असे जाहीरच केले होते. त्यानंतर ‘बिहारचे निकाल एकदाचे लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसे परिवर्तन घडवून दाखवतो’ वगैरे बतावण्या करून झाल्या. आता बात पुदुच्चेरीची सुरू आहे, पण जशी ‘दिल्ली बहुत दूर है’ त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’ असे चित्र आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.


वाचाः

अग्रलेखातील ठळक मुद्दे

– ‘पुदुच्चेरी झाले, आता महाराष्ट्र’ असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावे. महाराष्ट्राने घेतलेला निकाल हेच जनमानस आहे. महाराष्ट्राचे मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत. शेवटी राजकारणातील एक मंत्र महत्त्वाचा , तो सगळ्यांनाच लागू पडतो. ‘जे पेराल तेच उगवेल’ याचे भान प्रत्येक राज्यकर्त्याने ठेवले तर बरे

– मध्य प्रदेशातील महाराजा शिंदे व त्यांच्या समर्थकांना फोडून, आमिषे दाखवून भाजपने बहुमत विकत घेतले. पुद्दुचेरीतही वेगळे काय घडले? पुद्दुचेरीत सध्या जे काय घडतेय हा राजकीय वेश्या व्यवसाय असल्याचा संताप मुख्यमंत्री नारायणसामी यांनी व्यक्त केलाय, पण या वेश्या व्यवसायापासून गेल्या सत्तर वर्षांत कोणी अलिप्त राहिले आहे काय? सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना फोडण्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी यंत्रणांचा वापर केला, असा आरोप काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी केला. महाराष्ट्रात नेमके हेच सुरू असल्याने पुदुच्चेरी जे घडले त्यावर विश्वास ठेवावाच लागेल.

– देशात आता पंजाब, राजस्थान व छत्तीसगढ येथेच काँग्रेसची सरकारे उरली आहेत. महाराष्ट्र व झारखंडमध्ये आघाडी सरकारात काँग्रेस सामील आहे. झारखंडही अस्थिर केले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला गेला आहे. हे वातावरण लोकशाहीला मारक आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here