यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमधील ‘मुंबई कलेक्टिव्ह’ कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात सीताराम येचुरी यांनी हे आव्हान केलं. सीएए, एनआरसी आणि एनआरपीवरून देशाचं वातावरण तापलेलं आहे. सीएएवर बोललं तरी तुम्हाला देशद्रोही ठरवलं जात आहे. तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलत आहात, असा ठपका मारला जात आहे. एनआरसीवरून महात्मा गांधींच्या नावाने चुकीची माहिती पसरवली जात आहे. दिल्लीच्या शाहीन बागेत दहा हजार लोकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सर्वस्तरातून लोक आले आहेत. देशातील सर्वच विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरून लढत आहेत. का? तर देशातील लोकशाही धोक्यात आली असून या लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी तरुण रस्तावर उतरले आहेत, असं येचुरी म्हणाले. प्रत्येक धर्माचा एक पवित्र धर्मग्रथ असतो. काही धर्माचे दोन पवित्र धर्मग्रंथ आहेत. पण आपल्या भारताचा एकच पवित्र ग्रंथ असून संविधान हाच आपला सर्वोत्तम ग्रंध आहे, असं त्यांनी सांगितलं.
मी मागे हैदराबादमध्ये गेलो होतो. तिथे हैदराबादी बिर्याणी मागितली. मला कांद्याशिवाय बिर्याणी दिली. तेव्हा मी वेटरला त्याबद्दल विचारलं असता तो म्हणाले बिर्याणीपेक्षा कांदा महाग आहे. सध्या देशाची ही अवस्था आहे. देशात गेल्या ५० वर्षांतील सर्वात मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. कारखाने बंद होत आहेत. मात्र सरकारला त्याचं काहीही पडलेलं नाही. कालच्या बजेटमध्ये त्याबद्दल काहीही ठोस देण्यात आलेले नाही. एवढं मोठं लांबलचक भाषण अर्थमंत्र्यांनी केलं. पण पैसा कसा येणार? गुंतवणूक कशी करणार? रोजगार निर्मिती कशी होणार? यावर त्यात अवाक्षरही काढण्यात आलेलं नसल्याची टीकाही त्यांनी केली.
‘हम’वर घाला
हिंदुंचा ‘ह’ आणि मुसलमानांचा ‘म’ जेव्हा एकत्र येतो तेव्हा ‘हम’ तयार होतो. मात्र सध्या देशात या ‘हम’वरच हल्ला करण्याचं काम सुरू आहे. ‘हम’मध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच आम्ही कुणालाही भडकावत नाही. आम्ही तरुणांच्या पाठोपाठ जात आहोत. आजचे तरुण हे आधुनिक शिपाई आहेत. भारताचे भविष्य आहेत. देशातील द्वेष आणि फूट पाडण्याच्या राजकारणाला मुठमाती देण्याची जबाबदारी या तरुणांवर आहे. त्यामुळे अखंड भारतासाठी तरुणांनो, एकत्र या, असं आवाहनही त्यांनी केलं.
द्वेषाच्या राजकारणातून फूट पाडली जातेय: सुळे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या परिषदेला संबोधित केलं. आज आपला देश कठिण परिस्थितीतून जात आहे. यापूर्वी अशी परिस्थिती मी कधीच पाहिली नव्हती. देशात द्वेष पसरवला जात आहे. तो इतका रुजला आहे की, आपले मित्रही आपल्यापासून दुरावत आहेत. सोशल मीडियातून हा द्वेष अधिक पसरताना दिसतो आहे. माझ्या शाळा-कॉलेजातील मित्रही याच कारणाने दुरावले गेले आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. फेसबुकवर तीन मिनिटाचं लाइव्ह केलं तरी सर्वचजण तुमच्यावर टीका करायला तुटून पडतात. कोणत्या विषयावर कोण कधी टीका करेल हे सांगता येत नाही. प्रत्येक व्यक्तिची एक भूमिका आणि अजेंडा असतो. त्या चष्म्यातून तो इतरांना पाहत असतो. सुरुवातीला मलाही या सोशल मीडियाचा त्रास झाला. पण मी मुंबईची मुलगी आहे. कुणालाही घाबरत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे यांनी द्वेषाने किती मोठी पातळी गाठली आहे, यावरही भाष्य केलं. लोकांना टॉलरेट केलं जात आहे. त्यांच्यात फूट पाडली जात आहे. असंबंद्ध विषय काढले जात आहेत. इतकंच नव्हे तर तुम्ही कोणता सिनेमा पाहावा आणि कोणता सिनेमा पाहू नये, याचे सल्लेही दिले जात आहेत. तुम्ही बोललं तर ईडीची भीती दाखवली जात आहे. लोक घाबरलेले आहेत. त्यामुळे समाजानेच आता तुम्हाला काय करायचं हे ठरवलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी काल मला ४५ मिनिटाचं भाषणं ऐकावं आणि सहन करावं लागल्याचा टोलाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लगावला. या सेमिनारला अशोक ढवळेही उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times