मुंबई : जगभरातील आंबा प्रेमींना अस्सल हापूसचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘ग्लोबल कोकण’ने पुढाकार घेतला आहे. या वर्षीच्या हंगामातील आंब्याची पहिली मुहूर्ताची पेटी लंडनला निर्यात करण्यात आली. रत्नागिरी हापूस आंब्याच्या १ डझनाच्या २१ पेट्या लंडनमध्ये फेब्रुवारी महिन्यात दाखल झाल्या. पहिल्या १ डझनच्या पेटीला ५१ पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार ५ हजार रुपये विक्रमी दर मिळाला. तर अन्य २० डझनला प्रत्येकी ३० पौंड दर मिळाला आहे.

या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात प्रथमच निर्यात करण्यात आला. जर्मनी आणि युरोपमध्येही लवकरच आंब्याची निर्यात करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ, हापूसला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते १ मार्च २०२१ रोजी दिल्ली येथे होणार आहे.” असे ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण उपक्रमाला ‘ऍग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी’ आणि आणि ‘महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा’चे सहकार्य लाभले आहे.

फ्रूट ऑफ लेबनॉन (वेस्टर्न इंटरनॅशनल मार्केट, युके)च्या केतुल पटेल यांना या वर्षीचा पहिला २१ डझन रत्नागिरी हापूस आंबा खरेदी करण्याचा मान मिळाला. लंडनमधील इम्पोर्टर मराठी उद्योजक तेजस भोसले, कोकण ऍग्रो एक्सपोर्टचे उद्योजक दीपक परब यांच्या मदतीने कोकणातील अस्सल हापूस फेब्रुवारी महिन्यातच लंडनला दाखल झाला. राजापूर पडवे गावातील बाबू अवसरे, कुंभवडे गावातील पंढरीनाथ आंबेरकर आणि वाडा तिवरे गावातील जयवंत वेल्ये यांना राजापूरमधील हापूस आंबा थेट शेतातून लंडनमध्ये निर्यात करण्याची संधी उपलब्ध झाली.

कोकणातील भरपूर खनिजे असलेली, जांभा दगडाची लाल माती, समुद्राची आणि खाडीची खारी हवा, कोकणचा निसर्ग अशा अनुकूल वातावरणामुळे कोकणातील आंबा जगातील सर्वोत्तम आंबा समजला जातो. विजयदुर्ग खाडी परिसर, रत्नागिरी, देवगड, राजापूर परिसरातील आंबा हा प्रिमिअम आंबा आहे. पातळ साल, गोडसर चव, सोनेरी-केशरी रंगाचा आंबा या ठिकाणी पिकत असल्याने त्याला विशेष दर्जाही असतो. सर्वोत्तम शेतकरी, उत्तम बागा यांची निवड करून प्रिमिअम दर्जाचा आंबा बाजारात आणण्याचे आमचे ध्येय आहे. कोणताही भेसळ नसलेला आणि पूर्णतः नैसर्गिकरित्या पिकवलेला हा आंबा भारतातील आणि जगभरातील आंबा प्रेमींना उपलब्ध होईल” असा संकल्प केला असल्याचे यादवराव म्हणाले.

यंदा एक लाख डझन आंबे थेट विक्री करण्याचे उद्दिष्ट
या वर्षी कोकणातून युरोपच्या बाजारपेठेत १ लाख डझन आंबे थेट विक्री करण्याचे उद्दिष्टही आहे. तेजस भोसले व सचिन कदम हे लंडनमधील दोन मराठी तरुण रत्नागिरी, राजापूर, देवगडमधील हापूस आंब्याचे युरोपच्या बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करत आहेत. तसेच आंब्याच्या थेट विक्रीसाठी बनविलेल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी सुशांत रावराणे आणि अजित मराठे या दोन कोकणातील उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here