म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक जनतेला का माहिती देत नाहीत, या प्रकरणातील ऑडीओ सीडी व्हायरल झाल्या असून वनमंत्री संजय राठोड यांचा सहभाग असल्याचे पुरावे पुढे येत आहेत. तरीही कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. तरी तातडीने या प्रकरणाच्या तपासाबाबतची माहिती जनतेपुढे उघड करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे बुधवारी केली.

परळीतील युवती पूजा चव्हाण हिचा ७ फेब्रुवारीला पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत ऑडीओ सीडी व्हायरल झाल्या आहेत, पुरावेही पुढे आले आहेत. परंतु केवळ मंत्र्याला वाचविण्यासाठी पुणे पोलिस दबावाखाली काम करत आहेत. लोकांच्या मनातही चौकशीबाबत संभ्रम आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार व घटनेतील महत्त्वाचा दुवा अरुण राठोड बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस का प्रयत्न करत नाहीत, असा सवाल दरेकर यांनी केला.

‘अरुण राठोडला कोण बेपत्ता करू शकतो, याबाबत पोलिसांकडेही माहिती असेल. अरुण राठोडचे नातेवाईकही त्यांच्या गावातून बेपत्ता आहेत. त्याचे काही बरेवाईट झाले की काय, याबाबत जनतेच्या मनात भीती आहे. त्याचा शोध घेण्यास पोलिस अपयशी ठरले आहेत का,’ असा प्रश्न दरेकर यांनी केला. अरुण राठोडच्या गावातील घरी चोरी झाली आहे का? ऑडीओ क्लीप उघड होऊन १७ दिवस लोटले आहेत. प्रमुख संशयित तसेच या ऑडीओ क्लीपमध्ये ज्यांचा आवाज आहे, त्यांची चौकशी पोलिस का करत नाहीत, असे प्रश्न दरेकर यांनी पोलिस महासंचालकांपुढे मांडले.

पूजा चव्हाणचे कुटुंबीय दबावाखाली आहेत. महिलांच्या सुरक्षेततेसाठी शक्ती कायदा आणणारे गृहमंत्री कुठे आहेत? अरुण राठोड व एक महिला यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी दाखल झाले होते. त्या महिलेच्या नावाची नोंद पूजा चव्हाणच्या नावाशी मिळतीजुळती आहे, मग याबाबत चौकशी का केली जात नाही, असा सवाल दरेकर यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here