पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संपूर्ण प्रशासन करोना रोखण्याच्या प्रयत्नात असताना अशी गर्दी जमवल्यामुळं राठोड यांच्यावर चौफेर टीका आणि संताप व्यक्त होत आहे. असं असतानाचा आता पोहरादेवी येथील गर्दीमुळं करोनाचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना करोनाची लागण झाली आहे. कबिरदास यांच्या कुटुंबातील अन्य तिघांनाही करोनाची लागण झाली आहे. तर, काही जणांना करोनाची लक्षण जाणवत आहेत. एबीपीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
कबिरदास महाराजांनी २१ फेब्रुवारी रोजी करोनाची टेस्ट केली होती. मात्र, तरीही संजय राठोड यांचा पोहरादेवी दौरा असताना हजर राहिले. तसंच, राठोड यांच्यासोबतच ते दिवसभर होते.
पोहरादेवी येथील गर्दीबाबत कारवाईचे आदेश
जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून करोना संकटाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times