म. टा. प्रतिनिधी, नगर: येथील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकणारा विद्यार्थी आदेश विजय म्हस्के (वय १८, रा. पवार वस्ती, शेवगाव) याने बंद वर्गात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी झालेला हा प्रकार आज गुरूवारी महाविद्यालय सुरू झाल्यावर उघडकीस आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

तीन दिवस सुट्टीसाठी शिक्षकांची परवानगी घेऊन येतो, असे सांगून तो बुधावरी दुपारी महाविद्यालयात आला होता. येताना आईचा स्कार्फ सोबत घेऊन आला होता. त्या स्कार्फच्या साह्यानेच त्याने गळफास घेतला. महाविद्यालयात घडलेल्या या घटनेची माहिती प्राचार्य करमसिंग वसावे यांनी पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (२४ फेब्रुवारी) अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेणारा आदेश म्हस्के महाविद्यालयात नेहमीप्रमाणे आला होता. दुपारी १२ वाजता महाविद्यालय सुटल्यावर तो घरी निघून गेला. घरी जेवण करुन ‘दोन-तीन दिवस महाविद्यालयात येणार नाही’, याबद्दल शिक्षकांकडून परवानगी घेऊन येतो, असे आईला सांगून तो घराबाहेर पडला. बाहेर पडताना त्याने आपला मोबाइल घरीच ठेवला. सोबत आईचा स्कार्फ घेऊन गेला. त्यानंतर आपला मुलगा रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने आई व नातेवाईकांनी गावातील परीसर व महाविद्यालयात जाऊन शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे आई लक्ष्मीबाई यांनी बुधवारीच रात्री ११ वाजता मुलगा हरवल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दिली होती.

गुरूवारी सकाळी महाविद्यालयाच्या खोलीतच त्याचा मृतदेह आढळून आला. या महाविद्यालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर दोन वर्ग आहेत. त्यातील एक बंद आहे, तर दुसऱ्या खोलीत ११ वीचा वर्ग भरतो. गुरुवारी सकाळी महाविद्यालयात नेहमीप्रमाणे विद्यार्थी वर्गात आले. काही विद्यार्थ्यांना शेजारच्या बंद वर्गात कोणी तरी स्कार्फच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. शिक्षकांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पुढील कार्यवाही केली. मृत म्हस्के याच्या मागे आई व तीन बहिणी आहेत. त्याचा चुलतभाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळाच्या परिस्थितीवरून त्याने आत्महत्या केल्याचे दिसून येत असले तरी, त्या मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here